|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कांचन गंगा, माउंट मकाऊवर फडकला साताऱयाचा झेंडा

कांचन गंगा, माउंट मकाऊवर फडकला साताऱयाचा झेंडा 

जगातील तिसऱया क्रमांकाच्या शिखरावर आशिष माने याने इतर 9 साथीदारासह ठेवले पाऊल

प्रतिनिधी/ सातारा

एकेकाळी साताऱयातुन निघालेल्या फर्माननुसार अटकेपार भगवा फडकला होता. बुधवारच्या पहाटेच सातारच्या दोघांनी ही अनोखा पराक्रम करत हिमालयाच्या उंच शिखरावर भगवा फडकला. आशिष माने याने त्याच्या गिरीप्रेमी ग्रुपच्या 9 सदस्यांसह जगातल्या तिसऱया क्रमांकाच्या कांचन गंगा या शिखरावर पाऊल ठेवून भगवा, तिरंगा फडकवला. तर साताऱयाची एव्हरेस्ट कन्या शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रियांका मोहिते हिने तर केवळ 13 दिवसात जगातल्या 5 व्या क्रमांकांचे शिखर माउंट मकाऊ सर केले. सातारच्या दोन्ही गिर्यारोहकांनी केलेल्या कामगिरीबद्दल सातारकर त्यांचे कौतुक करत आहेत.

  सातारा शहरात अनेक गिर्यारोहक आहेत. त्यांच्या अनेक मोहिमा होतात. मात्र, साताऱयाच्या प्रियांका मोहिते हिने आतापर्यंत माउंट एव्हरेस्ट, माउंट लोत्से या मोहिमा फत्ते केल्या आहेत. गेल्या 13 दिवसांपूर्वी तिने माउंट मकाऊ हे जगातले पांचव्या क्रमांकाचे शिखर सर करण्यास सुरुवात केली. 8 हजार 485 मीटर एवढी या शिखराची उंची असून प्रियंकाने बुधवारी सकाळी हे पादाक्रांत केले.

पुण्यातल्या गिरीप्रेमी या संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांपूर्वी 2013 नंतर संस्थेने कांचन गंगाची मोहिम आखली होती. त्या मोहिमेचे नेतृत्व उमेश झिरपे हे करत आहेत. या मोहिमेचा प्रारंभ पुण्यातल्या शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात आला होता. या मोहिमेत साताऱयाचा एव्हरेस्टवीर आशिष माने याच्यासह प्रसाद जोशी, रूपेश खोपडे असे दहा सदस्य सहभागी झाले असून कांचन गंगा हे शिखर जगातले तीन नंबरचे उंच शिखर आहे. या शिखराची उंची 8 हजार 586 मीटर म्हणजेच 28 हजार 169 फूट एवढी आहे. शिखर सर करताच साताऱयाच्या आशिष माने याच्यासह सर्व गिर्यारोहकांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा देत शिवनेरी किल्ल्यावरून नेलेला भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज फडकवला. दरम्यान, तेथून काही अवशेषही परत वैज्ञानिकांना अभ्यासाकरिता घेऊन येत असल्याचे मोहीम प्रमुख उमेश झिरपे यांनी सांगितले.

आशिषने स्वतःचेचे रेकॉर्ड मोडले

गिर्यारोहक आशिष माने याने माउंट एव्हरेस्टसह यापूर्वी सात मोहिमा केल्या होत्या. ही त्याची आठवी मोहिम होती. 2013 मध्ये माउंट लोत्सेची मोहिम त्याने फत्ते केली होती.

आशिष माने हा पिरवाडी चाहुर येथील रहिवासी आहे. त्याचे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात प्राथमिक शिक्षण तर कोथरूड पुणे येथील राजे शिवराय प्रतिष्ठान कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. त्याने संगणक विज्ञान ही मास्टर डिग्री संपादन केली आहे. उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनिर्वातकडून पर्वतरोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याने आजपर्यंत 2012 मध्ये 8 हजार 848 मीटर उंचीचे माउंट एव्हरेस्ट, 2013 मध्ये 8 हजार 516 मीटर उंचीचे माउंट लोत्से, 2014 मध्ये 8 हजार 485 मीटर उंचीचे माउंट मकालु, 2017 मध्ये 8 हजार 163 मीटर उंचीचे माउंट मनास्लु या मोहिमा यशस्वी केल्या असून त्यास 2014 मध्ये राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला आहे. 

प्रियांका मोहितेने केला विक्रम

साताऱयाची एव्हरेस्टकन्या प्रियांका मोहिते हिने माउंट मकाऊ हे शिखर सर करणारी जगातली सर्वात कमी वयाची विरांगना आहे. 2016 मध्ये कृष्णा पाटील या गिर्यारोहक युवतीने हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने ते शिखर अर्ध्यातूनच माघारी परतावे लागले होते. प्रियांका ही स्पायोनियार ऍडव्हेंचर कंपनी या नेपाळच्या कंपनीकडून या मोहिमेत सहभागी झाली आहे. तिच्यासोबत भारतातले कोणीही गिर्यारोहक नसून 21 परदेशी गिर्यारोहक आहेत. 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेली शिखर सर करण्याची तिची पाचवी वेळ असून पुढच्या वर्षी ती कांचन गंगा हे शिखर सर करणार आहे, असे तिचे वडील मंगेश मोहिते यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.