|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » इस्लामपूर उपविभागातील पोलीसांना कुणी घरं देता का घरं…

इस्लामपूर उपविभागातील पोलीसांना कुणी घरं देता का घरं… 

अभिजीत जाधव/ इस्लामपूर

सण-उत्सव, मोर्चा, आंदोलने, या निमित्ताने उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, तास न् तास रस्त्यावर उभे राहून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणारे पोलीसच ‘असुरक्षीत’ बनले आहेत. इस्लामपूर उपविभागातील बहुतांशी पोलीस ठाण्याच्या हद्दतील पोलीस कर्मचाऱयांची निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. अनेक कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अशा निवासस्थानात राहत आहेत. त्यामुळे पोलीसांवर घर देता का घरं अशी म्हणण्याची वेळ आली आहे. काही जण तालुक्याच्या ठिकाणी घरे भाडयाने घेवून ये-जा करीत असल्याने अपघातात बळी जात आहेत. पोलीसांच्या निवाऱयासाठी शासनस्तरावर अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

       इस्लामपूर उपविभागात इस्लामपुरसह आष्टा, कासेगाव, कुरळप, शिराळा, कोकरुड या ठिकाणी पोलीस ठाणे आहेत. या सर्वच पोलीस ठाण्याकडे अधिकारी व कर्मचाऱयांची संख्याही बरीच आहे. पण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे असणाऱया कर्मचाऱयांवर कामाचा वाढता ताण आहे. गुन्हयांचा निपटारा करण्याबरोबरच मोर्चा, आंदोलने, मंत्र्यांचे दौरे यामध्ये पोलीसांना कुठला सण-उत्सव साजरा करता येत नाही. तसेच कुटुंबीयांनाही वेळ देता येत नाही. पोलीस तासन् तास रस्त्यावर आणि कुटुंबीय पोलीस लाईनीत पडक्या घरामध्ये राहत आहेत. स्वतःसह कुटुंबीय असुरक्षीत अवस्थेत असणाऱया पोलीसांकडून वरिष्ठ आणि समाजाच्या अपेक्षा नेहमीच वाढत्या राहतात. या अपेक्षांच्या ओझ्याखालीच कर्मचारी दबून जातो.

   इस्लामपुरसह आष्टा, शिराळा पोलीस ठाणे इमारतीसह सुसज्ज आहेत. पण सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीसांच्या निवासस्थानांची अवस्था मात्र  अतिशय दयनीय झाली आहे. नव्याने झालेल्या पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या उदघाटनावेळी तत्कालीन गृहमंत्री व लोकप्रतिनिधींनी मोठी-मोठी भाषणे करुन पोलीसांच्या निवासस्थानांचा प्रश्न ही सोडवू, अशा वल्गना केल्या. पण वर्षानुवर्षे या वल्गना हवेतच विरुन गेल्या. त्यामुळे डयुटीवरुन थकून-भागून आलेल्या पोलीसांना  घरी आल्यानंतर ही या पडक्या घरात स्वास्थ्य मिळत नाही.

  इस्लामपूर येथील पाच लाईन असून यामध्ये एकूण 50 घरे आहेत. यातील दहा घरांची पडझड झाली आहे. पडलेल्या घरात घुशी, उंदीर यांचे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे अन्य काही प्रमाणात सुस्थित असणाऱया निवासस्थानातील पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत आहे. अनेक घरांच्या छतावरील कौले फुटल्याने पावसाळयात अधिकच त्रास होतो. घरे धोकायदायक बनल्याने पोलीसांनी जीव मुठीत घेवून रहावे लागत आहे. पोलीस परेड ग्राऊंड शेजारी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही पोलीस वसाहत आहे. या वसाहतीमधील घरांची रचना साधी कौलारु आहे. जागा ही प्रशस्त आहे. शाळा व बाजारपेठ जवळ असल्याने पोलीस कुटुबीयांच्या दृष्टीने सोयीची आहे.

   सध्या इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये 105 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील 35 ते 40 कुटुंब या वसाहतीमध्ये राहतात. उर्वरित कर्मचारी बाहेर भाडयाने घरे घेवून राहत आहेत. पण असणारी वसाहतीमधील घरे कोंडवाडा बनली आहेत. स्वच्छतागृहांच्या दरवाजांची मोडतोड झाली आहे. या परिसरात गवत व अन्य झाडवेल उगवल्याने मोकाट जनावरांचा वावर आहे. घाणीचे साम्राज्य असल्याने या परिसरात दुर्गंधी आहे. त्यामुळे पोलीस कुटुंबीयांच्या आरोग्याचा  प्रश्न निर्माण झाला आहे. इस्लामपूर सारखीच अवस्था आष्टा व कुरळप पोलीस ठाण्यातील पोलीसांच्या वसाहतीची आहे. कुरळप येथील सर्वच घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे तिथे कुणीच राहत नाही. शिराळा येथील ही वसाहतीची अवस्था दयनीय आहे. या उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्याकडील कर्मचारी इस्लामपूर व शिराळा येथे भाडयाने घरे घेवून मोटारसायकलवरुन ये-जा करतात. कामाचा ताण, डयुटीवर वेळेत पोहचण्याची घाई यामुळे अनेक पोलीस कर्मचारी रस्ते अपघातात बळी जात आहेत. गेल्याच आठवडयात इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर कुरळप पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणारे हवलदार अजय सुतार यांना दुधाच्या टँकरने धडक दिल्याने प्राण गमवावा लागला. तर घस्ते नामक हवलदार मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यामुळे शासनाने नियुक्तीच्या पोलीस ठाणे हद्दीत सर्वसुविधांयुक्त घरे देवून त्यांनाच सुरक्षितता देणे गरजेचे आहे. 

   कासेगाव पोलीस ठाणे भाडयाच्या इमारतीत

  कासेगाव पोलीस ठाण्याची परवड अनेक वर्षापासून सुरु आहे. कासेगाव हे माजी मंत्री, राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांचे गाव आहे. त्यांच्याच गावातील पोलीस ठाणे सुरुवातीपासूनच भाडयाच्या इमारतीत आहे. त्यामुळे पोलीस वसाहतीचा प्रश्नच येत नाही. या ठिकाणी पोलीस वसाहतच नसल्याने पोलीसांना भाडयाची घरे शोधत फिरावे लागते. अनेक जण पोलीसांना घर भाडयाने देवून झंजट नको, म्हणून नकार देतात. त्यामुळे पोलीसांनी ‘कुणी घरं देता का घर’ असे म्हणत फिरावे लागते.

     दुय्यम अधिकारी बंगल्यांचीही दुरावस्था

   इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक यांचे बंगले काही प्रमाणात सुस्थितीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या बंगल्यांची डागडुजी होते. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक, व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांना बंगलेच नाहीत. असणारे एक-दोन बंगल्यांची दुरावस्था आहे. येथील एका बंगल्या तर वाहतूक पोलीस शाखेनेच कार्यालय थाटले आहे.