|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पाषाण खाणींवरील बेकायदा स्फोटांमुळे घरे, मंदिराला तडे

पाषाण खाणींवरील बेकायदा स्फोटांमुळे घरे, मंदिराला तडे 

वार्ताहर / नेत्रावळी

सांगे तालुक्यातील किडीबांद-पेडामळ, उगे येथील पाषाण खाणींवर बेकायदा जिलेटीन स्फोट घडवून आणून खडी फोडण्यात येत असून त्यामुळे सुमारे 150 मीटर अंतरावरील घरांच्या व मंदिराच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सदर खाणींवर कारवाई करावी व बेकायदा कृत्यांना लगाम घालावा, अशी मागणी करणारे निवेदन उगे येथील नागरिकांनी सांगे पोलीस स्थानकाला सादर केले आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, खाणमंत्री यांच्यासह दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, सांगेचे उपजिल्हाधिकारी, उगेचे सरपंच, प्रदूषण नियंत्रण मंडळ, खाण संचालक आदींना सादर करण्यात आलेल्या आहेत. सदर खाणमालकांनी संबंधित सरकारी यंत्रणेकडून स्फोटके वापरण्यासाठी परवाना घेतलेला नाही. तसेच पाषाण फोडण्यासाठी स्फोट घडवून आणताना नियमांचे पालन होत नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या पाषाण खाणींमुळे पर्यावरणाला हानी पोहोचली असून लोकांना धूळ प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. काही घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जेव्हा स्फोटकांचा वापर केला जातो त्यावेळी मोठमोठे दगड उसळून लोकांच्या घराजवळ पडतात. येथून वाहणाऱया नदीत यामुळे गाळ साचला असून पाणी दूषित होत आहे. पाषाण फोडण्याचे दुष्परिणाम उगे नदीवर उभारलेल्या पुलावरही झाले असून नदीवर जाणे लोकांना कठीण झाले आहे. शिवाय खाणींसाठी डोंगराची कापणी करण्यात आली असून झाडांची कत्तल करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तडे बुजविण्याचा प्रयत्न फोल

आपले घर पाषाण खाणीपासून 100 मीटर अंतरावर आहे. खाणींवर करण्यात येणाऱया स्फोटांची तीव्रता इतकी असते की, आपल्या घराला तडे गेले आहेत. आपण सिमेंटने ते तडे बुजविण्याचे प्रयत्न केले. पण स्फोटांमुळे पुन्हा भिंतींना तडे पडतात. सदर खाणी कायमच्या बंद करणे हा यावर एकमेव उपाय आहे, असे उगे येथील दीपक भंडारी यांनी याविषयी बोलताना सांगितले. उगे येथील सिद्धेश्वर मंदिराच्या भिंतींनाही तडे गेलेले आहेत. यापूर्वी देखील या खाणींविरुद्ध उगेवासियांनी आवाज उठविला होता. काही वर्षांपूर्वी बंद पडलेल्या या खाणी सध्या पुन्हा कार्यरत झाल्या आहेत.