|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत सांतइनेज नाल्याचा प्रश्न

भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत सांतइनेज नाल्याचा प्रश्न 

प्रतिनिधी/ पणजी

भाजप आणि त्यांच्या आमदारांनी 1994 पासून आतापर्यंत म्हणजे गेली 25 वर्षे पणजी मतदारसंघासाठी काहीच केले नाही, हे आता सिद्ध झाले असून सांतइनेज नाला हा त्याला साक्षीदार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला. 1994 सांतइनेज नाल्याचा विषय करून भाजपने पहिल्यांदा पणजीची निवडणूक जिंकली आणि आता 25 वर्षे झाली तरी या पोटनिवडणुकीत भाजपने तोच विषय घेतला आहे. यावरून भाजप आमदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते यतीश नाईक यांनी केली. त्यासाठी त्यांनी 1994 मधील भाजपची वृत्तपत्रातील जाहिरात आणि आताचा जाहीरनामा याची प्रत पणजीतील पत्रकार परिषदेत सादर केली.

श्री. नाईक यांनी सांगितले की गेली 25 वर्षे पणजी मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहे. परंतु त्या नाल्याचा प्रश्न काही सुटला नाही. पाणी, कचरा, वीज, पार्किंग हे विषय जसेच्या तसेच आहेत. ते 25 वर्षे झाली तरी सुटलेले नाहीत. यावरून तो पक्ष त्यांचे आमदार हे पूर्णपणे अपयशी ठरले हेच पुराव्यानीशी सिद्ध होते. पणजीच्या अनेक भागात आज पाणी मिळत नाही. स्वच्छतेबाबत तर काही बोलायलाच नको. स्मार्ट सिटी हे फक्त नावासाठीच असून पणजीत काहीही स्मार्ट नाही, असे श्री. नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.

भाजप व त्यांच्या आमदारांच्या गेल्या 25 वर्षातील अपयशी कारकिर्दीला पणजीतील मतदार कंटाळले असून ते आताच्या या पोटनिवडणुकीत भाजपला नाकारणार आहेत हे स्पष्ट दिसते. गेल्या 25 वर्षांत पणजीत भाजपची सत्ता असून कोणताही विकास झाला नाही. उलट पणजी नगरी विकासात मागे पडली, अशी टीका नाईक यांनी केली.

भाजपच्या जाहीरनाम्यात गेली 25 वर्षे तेच प्रश्न, तेच मुद्दे येत असून त्यात काहीच फरक पडलेला नाही. याचा अर्थ भाजपने, त्यांच्या आमदारांनी पणजीसाठी काहीच केलेले नाही. पणजीत कोणताही फरक झालेला नाही हे सत्य आता समोर आले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.