|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पांडुरंग सहस्त्रबुद्धे यांचे निधन

पांडुरंग सहस्त्रबुद्धे यांचे निधन 

प्रतिनिधी/ दोडामार्ग

‘तरुण भारत’चे पत्रकार तथा साहित्यिक पांडुरंग काशिनाथ सहस्त्रबुद्धे (83, रा. कुंब्रल-बाग, ता. दोडामार्ग) यांचे बुधवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. कुंब्रल येथे गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सहस्त्रबुद्धे यांनी गोव्यातील कमलेश्वर हायस्कूल कोरगाव, पेडणे-गोवा येथे इंग्रजीचे शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्या ठिकाणी इंग्रजी विषयातील गाढय़ा अभ्यासाबद्दल अनेकवेळा त्यांचे कौतुकही झाले होते. मराठी विषयावरही त्यांचे प्रभूत्व होते. त्यांचे लेख, कथा, ललित लेखन ‘तरुण भारत’सह अन्य वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. ‘तरुण भारत’मध्ये दोडामार्ग व कुंब्रल वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले होते. पत्रकार, साहित्य क्षेत्राबरोबरच चित्रकार, दिग्दर्शक, हार्मोनियम वादक म्हणूनही त्यांची ओळख होती. अनेक संगीत, पौराणिक, ऐतिहासिक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले हेते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली असा परिवार आहे. सहस्त्रबुद्धे यांनी अनेक विषयांवर लेखन केले. मात्र, पुस्तक रुपात ‘अबोध’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. वाचकांच्या तो खूप पसंतीस आला.

   सहस्त्रबुद्धे यांनी इंग्रजी विषयातून अध्यापन केले असले, तरी मराठी भाषेचा त्यांना प्रचंड आदर व अभ्यास होता. साहित्याबद्दल त्यांना रुची होती. लेखक, साहित्यिक निर्माण व्हावेत, अशी त्यांची भावना असायची. त्यामुळे ते आजारी असले, तरी साहित्यक्षेत्रातील कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थिती दर्शवित. नवोदितांनाही ते मार्गदर्शन करायचे. साहित्यिक ह. मो. मराठे यांचे ते शिष्य होते.