|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बुधवारपासून सुरू पुणे-अहमदाबाद भरारी

बुधवारपासून सुरू पुणे-अहमदाबाद भरारी 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विमानतळावरून बुधवारपासून पुणे आणि अहमदाबादसाठीच्या विमानसेवांना प्रारंभ झाला आहे. यामुळे आता विमानतळावरून सहा विमाने झेप घेणार आहेत. स्टार एअरने अहमदाबादसाठी व अलायन्स एअरने पुण्यासाठीची विमानसेवा सुरू केली आहे. बेंगळूरसाठी 3 व अहमदाबाद, पुणे तसेच हैद्राबादसाठी दररोज प्रत्येकी 1 याप्रमाणे विमानतळावरून उड्डाण होणार आहे.

स्टार एअर कंपनीची उडान योजनेंतर्गत बेळगाव-अहमदाबाद विमानसेवा बुधवारपासून सुरू झाली आहे. आचारसंहिता असल्याने औपचारिक पद्धतीने उद्घाटन करून या सेवेचा कार्यारंभ करण्यात आला आहे. विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्तेच हे उद्घाटन झाले आहे.

50 आसन क्षमतेचे विमान स्टार एअरने अहमदाबाद सेवेसाठी उपलब्ध केले आहे. पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून बेळगावहून अहमदाबादला 43 प्रवासी गेले असून 41 प्रवासी अहमदाबादहून बेळगावला आले आहेत. अनेक दिवसांपासून या विमानसेवेची प्रतीक्षा लागून राहिली होती. आता व्यापारी व वेगवेगळय़ा कारणांनी गुजरात व उत्तर भारताकडे प्रवास करणाऱयांची या विमानसेवेमुळे चांगलीच सोय होणार आहे.

रविवार वगळता दररोज सकाळी 9.20 वाजता बेळगावहून अहमदाबादसाठीचे विमान झेप घेणार असून ते तेथे 11.05 ला पोहोचणार आहे. 11.25 वाजता अहमदाबादहून निघून ते पुन्हा दुपारी 1 वाजता बेळगावला परतणार आहे. रविवारी या विमानसेवेच्या वेळापत्रकात थोडा बदल आहे. सायंकाळी 4.40 ला बेळगावहून निघून 6.15 वाजता अहमदाबादला पोहोचणार असून तेथून सायंकाळी 6.45 ला निघून रात्री 8.20 ला बेळगावला पोहोचणार आहे.

अलायन्स एअरचे बेळगाव-पुणे विमान सोमवार वगळता आठवडय़ाचे सहा दिवस झेप घेणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी बेळगावहून दुपारी 4.05 वाजता हे विमान निघून सायंकाळी 5.20 वाजता पुण्याला पोहोचणार आहे. पुणे येथून सायंकाळी 5.45 ला निघून 7.05 वाजता बेळगावला पोहोचणार आहे.

           पाच ते शून्य आणि आता शून्य ते सहा

बेळगाव विमानतळाची परिस्थिती आता सुधारली आहे. एका वेळी सुरू असलेली पाच विमाने बंद होऊन शून्य विमानसेवेपर्यंतचा प्रवास केलेल्या या विमानतळावर आता सहा विमानसेवा उपलब्ध झाल्या आहेत. 77 वर्षे वयाच्या या विमानतळाला आता चांगले दिवस आलेले आहेत. बेंगळूर, हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहरांना जाण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे.