|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खोदाई शुल्कासह 46 कोटीची फरफॉर्मन्स गॅरंटी द्या

खोदाई शुल्कासह 46 कोटीची फरफॉर्मन्स गॅरंटी द्या 

महापालिकेची हेस्कॉमला नोटीस : भूमिगत विद्युत वाहिन्यांमुळे बहुतांश रस्त्यांची दैनावस्था

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर-उपनगरात भूमिगत विद्युत वाहिन्या घालताना महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली नाही. यामुळे 17 कोटी खोदाई शुल्क भरण्याची नोटीस हेस्कॉमला देण्यात आली होती. पण अनेक वेळा नोटीस बजावूनही शुल्क भरणा केले नसल्याने आता पुन्हा हुबळी कार्यालयाला नोटीस बजावून 17 कोटीसह 46 कोटीची परफॉर्मन्स गॅरंटी देण्याची सूचना करण्यात आली आहे.

शहराचा विकास करण्यात येत आहे. याकरिता भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. पण भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याकरिता रस्ता खोदाई करण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. पण हेस्कॉमने महापालिकेकडून परवानगी न घेताच शहरातील सर्वच रस्त्यांची खोदाई करून भूमिगत विद्युत वाहिन्या घातल्या आहेत. यामुळे बहुतांश रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची सूचना हेस्कॉमला अनेक वेळा करण्यात आली. महापालिका सभागृहात हेस्कॉमच्या कामकाजाबाबत आक्षेप घेऊन कामकाज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राजकीय दबावतंत्रामुळे काम बंद करण्यात आले नाही. विद्युत वाहिन्या घातल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सध्या महापालिकेच्या रस्त्यांचा वापर जंक्शन बॉक्स, कनेक्शन बॉक्स ठेवण्यासाठी केला जात आहे. तसेच विद्युत वाहिन्या घालताना डेनेज वाहिन्या व चेंबर, जलवाहिन्यांचे नुकसान करण्यात आले आहे. यामुळे 17 कोटी रुपये भरण्याची नोटीस महापालिकेने हेस्कॉमला बजावली होती. मात्र याबाबत हेस्कॉमने हुबळी कार्यालयाकडे खोदाई शुल्क भरण्यास टाळाटाळ चालविली आहे. वर्ष झाले तरी सदर रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली नाही. पण महापालिकेने व्यापारी संकुलाच्या गाळय़ांचे विद्युत बिल भरणा केले नसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली होती. क्षुल्लक बिलाकरिता हेस्कॉम कारवाई करते, मग 17 कोटी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन कारवाई का करीत नाही, असा मुद्दा महापालिका सभागृहात करण्यात आला होता.

सदर रक्कम वसूल करण्याचा ठराव करण्यात आला होता. यानुसार हेस्कॉमला नोटीस बजावूनदेखील काहीच फरक पडला नाही. सदर रक्कम जमा करण्यास टाळाटाळ चालविली असल्याने आता पुन्हा हुबळी कार्यालयात नोटीस पाठवून 17 कोटीची रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच 46 कोटीची परफॉर्मन्स गॅरंटी देण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे याबाबत हेस्कॉम कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे..