|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अतिक्रमण हटाव कारवाई ठरली ‘स्टंट’च

अतिक्रमण हटाव कारवाई ठरली ‘स्टंट’च 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी नगरपालिकेच्यावतीने गेल्या 15 दिवसांपूर्वी म्हणजेच एप्रिल अखेरीस शहरातील जुन्या पी. बी. रोडवर अतिक्रमण हटाव ही धडक मोहीम राबविण्यात आली. मोठय़ा जोशात पालिका अधिकारी व कर्मचाऱयांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कार्यवाही केली. पण ही कारवाई होऊन पंधरा दिवस झाले न झाले तोच पुन्हा अतिक्रमणांना उधाण आले असून पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे.

निपाणी शहराला अतिक्रमण हटाव मोहीम नवी नाही. कारण पालिका प्रशासन वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहीम हा उत्सव म्हणून राबविते. एक-दोन दिवस कारवाई करते. नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्याचा अनुभव सर्वांनीच अनुभवला आहे. अनेकवेळा तर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पालिकेने शहरातील अतिक्रमित खोकी हटविली. अनेक रोजगाराचे हात बेकार करण्याची किमयाही साधण्यात आली. स्वच्छ व सुंदर निपाणी असे स्वप्न रंगवत निपाणीकरांनी नेहमीच अशा मोहिमांचे स्वागत केले.

29 एप्रिल रोजी पालिका अधिकाऱयांनी आयुक्त बसवराज जिद्दी यांच्या मार्गदर्शनानुसार जुन्या पी. बी. रोड या शहरातील मुख्य व रहदारीच्या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. यामध्ये गटारी बाहेर थाटलेली सर्व दुकाने हटविण्याची कारवाई केली. दिवसभराच्या या कारवाईत अतिक्रमणात गुरफटलेल्या या मार्गाने मोकळा श्वासही घेतला. पण यानंतर कोठेच पालिकेने कारवाई केली नाही व कारवाई केलेल्या मार्गावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये. यासाठी दक्षताही घेतली नाही. यामुळे पुन्हा हा मार्ग अतिक्रमणांनी व्यापला जात असून अतिक्रमण मोहिमेचा येरे माझ्या मागल्याचा अनुभव येत आहे. यातून संताप व्यक्त होताना कारवाईत सातत्य राहणार कधी?, असा सवाल व्यक्त होत आहे.