|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कित्तूरनजीक पेट्रोल पंपावर दरोडा

कित्तूरनजीक पेट्रोल पंपावर दरोडा 

दोघांचा  गळा कापून खून, 1 लाख 55 हजार रुपयांची लूट

बाळेपुंद्री/ वार्ताहर

पेट्रोलपंपावर दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी दोघा कर्मचाऱयांचा गळा कापून खून केला. त्यानंतर 1 लाख 55 हजार रुपये लंपास केले. कित्तूर व धारवाड शहराजवळील राष्ट्रीय महामहार्गावरील शिवा पेट्रोलपंपावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

 मंजुनाथ पट्टणशेट्टी (वय 28 रा. लिंगदळी, ता. कित्तूर) व मुश्ताक बिडी (वय 32, रा. तिगडोळी) अशी मयत कर्मचाऱयांची नावे आहेत. या विषयी माहिती अशी की, कित्तूर व धारवाड शहराजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर शिवा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोलपंपावर गेल्या काही वर्षांपासून मंजुनाथ व मुश्ताक हे दोघेही रात्रपाळीत काम करतात. रात्री ते पेट्रोल पंपावरच झोपायला असतात. मंगळवारी मध्यरात्री दोघेही काम आटोपून झोपले होते. मंजुनाथ हा पेट्रोल पंपासमोर झोपला होता तर मुश्ताक हा आत झोपला होता. यावेळी आलेल्या दरोडेखोरांनी त्या दोघांचाही तीक्ष्ण हत्याराने गळा कापून खून केला. त्यानंतर पेट्रोल पंपावर असलेली 1 लाख 55 हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. कित्तूर व धारवाड या दोन्ही शहरालगतच्या सीमेनजीक ही घटना घडल्यामुळे बेळगावचे पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी व कित्तूर व धारवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

पेट्रोलपंपावरील दोघांचा खून केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कित्तूर व धारवाड पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी फुटेजची तपासणी करून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची नोंद कित्तूर पोलीस ठाण्यात झाली आहे.