|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » करजुवे खाडीत 11 लाखांची वाळू जप्त

करजुवे खाडीत 11 लाखांची वाळू जप्त 

वार्ताहर/ संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील गडनदीच्या पात्रात करजुवे खाडीत 11 लाख किंमतीचा वाळू साठा महसूल विभागाने छापा टाकून जप्त केला आहे. महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र गडनदी पात्रात वाळू उपसा करुन अवैध साठा करणारे फरारी झाले आहे. यासंबंधी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करजुवे खाडीत गडनदीच्या पात्रातील राजेश पुंडलिक नलावडे यांच्या मालकीच्या जमिनीत अज्ञाताने खड्डा खणून बनवलेल्या कुंडीत वाळू साठा केल्याची माहिती  महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार महसूल विभागाने येथे बुधवारी छापा टाकत 2 लाख 90 हजार किंमतीची व याच ठिकाणी दुसऱया खड्डय़ात 1 लाख 10 हजार रुपयांची 40.7 ब्रास वाळू जप्त केली. तसेच 30 एप्रिल रोजी सकाळी 8.50 वाजण्याच्या दरम्यान करजुवे खाडीतील सर्वे क्रमांक 45 व ह.सा.नं 6 क्षेत्रात तयार केलेल्या कुंडीत 23 ब्रास वाळू सुमारे 2 लाख 30 हजार किंमतीची तसेच कुंडी शेजारी दोन वाळूचे डेपो 29 ब्रास 2 लाख 90 हजार किंमतीची व 20 ब्रास सुमारे लाख रुपये किंमत अशी सुमारे 72 ब्रास 7 लाख 20 हजार वाळू परवाना नसताना अवैधरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने उत्खनन करुन साठा केला होता. याबाबतचा गुन्हा देखील बुधवार 15 रोजीच दाखल करण्यात आला. दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत सुमारे 11 लाख 20 हजार रुपयांची वाळू जप्त केली आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात माखजन मंडळ अधिकारी सुहास विठ्ठल मांगले यांनी फिर्याद दिली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ग्रामस्थांशी चर्चा

 करजुवे खाडीभागात राजरोसपण सुरु असलेला वाळू उत्खनन रोखण्यासाठी करजुवे खाडी विभागात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देत पहाणी केली. यावेळी सुनील चव्हाण यांनी ग्रामस्थांनी वाळू माफियांना सहकार्य न करण्याचे आवाहन केले. तसेच जर कोणी जमीन मालक वाळू माफियांना सहकार्य करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सूचनाही पेली.

‘तरुण भारत’ मधील वृत्ताची दखल

करजुवे खाडीत वाळू माफियांमुळे मारामारी तसेच शांत खाडी दूषित होत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिध्द करण्यात आले होते. वाळू उत्खनन करुन राजरोसपणे वाळू वाहतूक करत असल्याचे वृत्तही प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेऊनच ही मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.