|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवाजी पेठेत वाद्यांच्या गजरात महाकालीदेवीची नगरप्रदक्षिणा

शिवाजी पेठेत वाद्यांच्या गजरात महाकालीदेवीची नगरप्रदक्षिणा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

शिवाजी पेठेतील महाकाली मंदिरात अक्षय तृतीयेपासून सुरू झालेल्या उत्सवाची  मंगळवारी सायंकाळी महाकालीदेवीच्या नगरप्रदक्षिणेने सांगता झाली. सकाळी  महाप्रसाद झाला. सायंकाळी पालखीतून देवीची मूर्ती नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. देवीच्या पालखीचे पूजन सरनाईक परिवारातील मानकऱयांच्या हस्ते झाले. प्रदक्षिणा मार्गावर आकर्षक रांगोळय़ासह फुलांच्या पायघडय़ा घातल्या होत्या. पालखी सोहळय़ात ढोल-ताशा, महिलांचे लेझीम पथक आणि केरळच्या त्रिसूर पथक आणि कथकली नृत्याने लक्ष वेधून घेतले. प्रदक्षिणा मार्गावर 15 मंडळांनी महाप्रसादाचा उपक्रम राबवला. त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. 

साकोली कॉर्नर येथे नवदुर्गांपैकी एक असलेल्या महाकालीदेवीचे उत्तराभिमुखी मंदिर आहे. येथे महाकाली तालीम मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी अक्षय तृतीयेपासून सात दिवस विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाही अक्षय तृतीयेला महाकाली देवीला अभिषेक घालून उत्सवाला प्रारंभ झाला. रविवारी नवचंडी होम, महाप्रसाद झाला. उत्सवकाळात हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मंगळवारी महाकालीदेवी उत्सवाची सांगता देवीच्या नगरप्रदक्षिणेने झाली.