|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विकास कामांचा परिपूर्ण प्रस्ताव 15 जूनपर्यंत करा

विकास कामांचा परिपूर्ण प्रस्ताव 15 जूनपर्यंत करा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व अनुसूचीत जाती उपयोजनांचे विविध विकास कामांचे परिपूर्ण प्रस्ताव 15 जून 2019 पर्यंत करा, अशा सूचना सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध योजना कार्यक्रमांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, समाज कल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, सन 2019- 2020 या आर्थिक वर्षामध्ये लोकसभा व विधानसभा  निवडणूक आचारसंहिता कालावधी असल्याने जिल्हा नियोजन व अनुसूचीत जाती उपयोजनांचा निधी खर्च करण्यासाठी अल्प कालावधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व विभागाच्या प्रमुख अधिकायांनी जिल्हा नियोजन समितीकडून मिळणारा निधी शंभर टक्के खर्च होण्यासाठी आचारसंहिता वगळून मिळाणाऱया कालावधीमध्ये आपआपल्या विभागाचे परिपूर्ण प्रस्ताव आपल्या विभागांना तांत्रीक मान्यतेसाठी तातडीने पाठवावे. तांत्रीक मान्यता मिळालेले प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे प्रशासकीय मान्यतेसाठी 15 जून पर्यंत सादर करावेत. विकासात्मक कामे करण्यासाठी वेळ अपूरा असल्याने अधिकाऱयांनी या कामांसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच प्राप्त होणारा निधी विहित वेळेत खर्च करावा, खर्च केलेल्या निधीचे ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा नियोजन समितीला तातडीने सादर करावे, अशा सूचनाही दिल्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीचा सन 2018 -2019 या आर्थिक वर्षातील 378 .53 लाख निधी खर्च झालेला आहे. तसेच अनुसूचीत जाती उपयोजनेचा 113 कोटी निधी पैकी  93 कोटी निधी खर्च झाला असून 23 कोटी निधी शासनास समर्पित केले असल्याचे सांगितले.