|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘संगती’च्या परिणामावर व्यक्तीविकास अवलंबून

‘संगती’च्या परिणामावर व्यक्तीविकास अवलंबून 

प्रतिनिधी /संकेश्वर :

मानवी जीवन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवन सुंदर करायचे असल्यास चांगले विचार, सुसंस्कृत व संस्कारीत माणसाची संगत महत्त्वाची आहे. आपल्या देशात अनेक संत पुरुष, महापुरुष व योगपुरुष झाले. त्यांच्यामागे एक उत्तम गुरु लाभल्याची उदाहरणे आहेत. हिच परंपरा पुढे चालू ठेवल्यास आपल्या देशाची संस्कृती अधिक शक्तीशाली बनणार, यासाठी आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी उत्तम माणूस शोधा. त्याच्या सान्निध्यात रहा व नवा समाज घडवा, असे विचार बेंगळूर येथील मराठा समाजाचे गोसावी पीठाचे मंजुनाथ स्वामीजींनी मांडले.

येथील शंकरलिंग भवनास भेट देऊन मराठा समाज बांधवांना उद्देशून ते बोलत होते. स्वामीजी पुढे म्हणाले, चांगली माणसं घडविण्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांच्यासारखे गुरु मानवी समाजाला भेटले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज, स्वामी विवेकानंद असे महापुरुष होऊन गेले. त्यांचा आदर्श प्रत्येक युवकाने घ्यावा.

समाजात चांगले विचार रुजवावेत. आपल्या पारंपरिक संस्कृतीचे धडे नव्या पिढीला द्यावेत तरच उद्याचा नवा समाज उदयास येणार आहे. साधू, संत, युगपुरुष, महापुरुषांनी समाजातील वाईट रुढींचा नाश करून समाजाला उभारी देण्याचा प्रयत्न आपल्या उपदेशांनी केला. त्या उपदेशात शक्ती होती म्हणूनच आजही आपल्या देशात संस्कृती टिकविण्याचे प्रभावीपणे कार्य होताना दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी स्वामीजींचे स्वागत समाजाचे प्रमुख श्रीकांत हतनुरी, एल. पी. शेंडगे, जयप्रकाश सावंत, सुभाष कासारकर आदींनी शाल, श्रीफळ देऊन केले. कार्यक्रमास आप्पा मोरे, दीपक भिसे, राजू बांबरे, नेताजी आगम, समीर पाटील, रामू जाधव, शिवाजी कवळीकट्टीकर, प्रमोद जाधव, संतोष पाटील, प्रकाश पाटील, किरण पाटील, अमोल पाटील, दत्ता खराडे, राहुल पाटील, नामदेव मुसळे, प्रकाश घाटगे, बंडू बोडे, सचिन मोकाशी, आप्पा शिंत्रे, आनंद मोरे, ए. पी. चौगुले, प्रशांत कदम, शाम यादव, उत्तम माने, प्रभाकर देसाई, जयप्रकाश खाडे, राजू शेलार, नंदू बरगे, सुहास भिसे, प्रकाश इंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.