|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तृणमूल गुंडांचा बंगालमध्ये हैदोस

तृणमूल गुंडांचा बंगालमध्ये हैदोस 

मथुरापूर / वृत्तसंस्था :

पश्चिम बंगालच्या मथुरापूमध्ये गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. मागील 3-4 दिवसांपासून येथे जे घडत आहेत ते सर्वजण पाहत आहेत. तृणमूलच्या गुंडांनी केलेल्या हिंसाचारामुळे लोकशाहीची बदनामी झाली आहे. तृणमूलच्या गुंडांनी रात्रीच्या वेळी महान शिक्षणतज्ञ आणि समाज सुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड केली. महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, तेथील चित्रण प्रसिद्ध का करण्यात आले नाही? तृणमूल सरकार नारदा-शारदा घोटाळय़ांप्रमाणेच या हल्ल्याचे पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

कुठला पक्ष बंगालच्या गौरवाच्या रक्षणासाठी लढतोय आणि कोण घुसखोरांना थारा देतोय हे ईश्वरचंद जेथे कुठे असतील तेथून पाहत असतील. ममतानीं भाजपच्या कार्यालयावर कब्जा करण्याची धमकी दिली आहे. ममता बॅनर्जी भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर कब्जा करण्याची धमकी देत आहेत. मतपेढीच्या राजकारणासाठी ममता दीदी कुठल्या पातळीपयंत घसरू शकतात हे यातून दिसून येते. बंगालच्या मुलींना कारण नसताना तुरुंगात डांबतात आणि घुसखोर आणि तस्करांना मात्र त्यांनी सूट दिल्याचा शाब्दिक हल्ला मोदींनी चढविला आहे.

दुर्गा पूजा आणि सरस्वती पूजा करण्यास बंगालमध्ये अडविले जाते. जय श्रीराम म्हणणे राज्यात गुन्हा ठरले आहे. सर्व सर्वेक्षणांचे निष्कर्ष भाजपच्या बाजूने आहते. भाजप पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. ममता दीदींना बंगाला आणीबाणीच्या कालखंडात लोटले आहे. राज्यात देवाचे नाव घेतल्यावर लोकांना अटक करणे, भाजपला सभा घेण्याची अनुमती न देणे आणि ठिकठिकाणी हिंसाचार आणि हल्ला होणे नित्याचेच ठरल्याचे मोदी म्हणाले.

ममतांचे गुंड गोळय़ा आणि बॉम्ब घेऊन विनाश करण्यासाठी उतरले आहेत. भाजपच्या उमेदवारांवर हल्ले होत असले तरीही लोकशाहीबद्दल असलेल्या श्रद्धेपोटी बंगालचे माझे बंधूभगिनी त्यांना लढा देत आहेत. ममतांची ही अत्याचारी सत्ता एक दिवस नक्कीच दूर होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

पाक पंतप्रधानांबद्दल ‘ममत्व’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री भारताच्या पंतप्रधानांना स्वतःचा पंतप्रधान मानत नाहीत, पण पाकिस्तानी पंतप्रधानांची प्रशंसा करताना थकत नाहीत. स्वतःच्या भाच्यासोबत मिळून त्यांनी टोलाबाज आणि तस्करांचे एक सिंडिकेट त्यांनी चालविल्याने पश्चिम बंगालचा सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. बुआ-भतीजा (ममता-अभिषेक) यांनी बंगालला बदनाम केले आहे. लूट तसेच हिंसाचार फैलावण्यात ते आघाडीवर आहेत. सामान्यांपासून पोलीस प्रशासनही यामुळे त्रस्त आहे. काही दिवसांपूर्वीच एका आयपीएस अधिकाऱयाने याच कारणामुळे आत्महत्या केली आहे. राज्याच्या विकासाला यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. ममतांना पश्चिम बंगालच्या सामान्यांची चिंता नाही, केवळ सत्तेचा अहंकार असल्याचे मोदी म्हणाले.

बूथ बुथसे टीएमसी साफ

स्वामी विवेकानंद यांच्यापासून श्यामाप्रसाद मुखर्जीपर्यंत भाजपचे चिंतन निर्माण करण्यास बंगालच्या संस्कृतीचे मोठे योगदान राहिले आहे. बंगालच्या गौरवाचे रक्षण करणे ही भाजपची प्राथमिकता आहे. भाजपवर या विशेष आशीर्वादासह बंगालची जनता ममतांना लोकशाहीचा खरा अर्थ समजावून सांगणार असल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला ‘चुपचाप कमल छाप’ आणि बूथ बूथ से टीएमसी साफ’ अशा घोषणा द्यायला लावल्या आहेत.