|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पावलावरच ‘भाजपा’चे पाऊल

मनपात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पावलावरच ‘भाजपा’चे पाऊल 

के.के.जाधव /मिरज :

महापालिकेच्या अस्तित्वानंतर मिरजकरांच्या विकासाच्या अपेक्षा निश्चितच उंचावल्या होत्या. पण, काँग्रेस आणि महाआघाडीच्या सत्ताधाऱयांनी मिरजकरांचा भ्रमनिरास केला. त्यामुळे त्यांना कंटाळलेल्या नागरिकांनी सध्या भाजपाला संधी दिली. यामध्ये केवळ सत्ताबदल झाला, पण कारभारी तेच राहिल्याने भाजपाचीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पावलावरच पाऊले पडताना दिसत आहेत. निश्चितच त्यामुळे शहराच्या विकासाला खो बसण्याबरोबर ऐतिहासिक ओळखही पुसली जात आहे. अनेक वर्षांपासूनच्या समस्या आजही तशाच आ वासून उभ्या असताना, भाजपाकडून मात्र कोटय़ावधी रुपयांच्या निधीचे तुणतुणे सतत वाजविले जात आहे. आजतागायत त्याचा प्रारंभ मात्र झालेला दिसत नाही. त्यामुळे मिरजेचा विकास मृगजळ ठरतो की काय? अशी धारणा आता येथील नागरिकांची झाली आहे.

ऐतिहासिक, संस्कृतीक वारसा लाभलेलं शहर म्हणून मिरजेची ओळख आहे. वैद्यकीय नगरी, तंतूवाद्याचे माहेरघर, नाटय़पंढरी असाही या नगरीचा नावलौकीक आहे. महापालिकेच्या अस्तित्वानंतर या शहरातील महत्त्वपूर्ण समस्या मार्गी लागून राज्यात ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून परिपूर्ण विकासाने नावारुपाला येईल, अशी मिरजकरांची धारणा होती. पण, मनपातील काँग्रेस, महाआघाडी आणि सध्याच्या भाजपा शासनाने नागरिकांची ही धारणा फोल ठरविली आहे. मनपाच्या अस्तित्वाला दोन दशके लोटली असतानाही शहरातील एकही मुलभूत प्रश्न आजतागायत मार्गी लागला नाही, हे मिरजकरांचे दुर्दैव आहे. अद्ययावत भाजी मंडई, क्रीडांगणाची दुरूस्ती, आकर्षक बगिचा, रस्त्याचे रुंदीकरण, मध्यवर्ती ठिकाणची वाढती अतिक्रमणे, सतत खोदले जाणारे रस्ते, बिघडलेली सिग्नल व्यवस्था, मनपा मालकीच्या काळवंडलेल्या इमारती असे एक ना अनेक प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आत्तापर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱयांनी या मुलभूत प्रश्नांकडे केवळ मतावर डोळा ठेवून कानाडोळा केला आहे.