|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतमजुराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

शेतमजुराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक 

प्रतिनिधी /आटपाडी :

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील सर्वसामान्य ऊसतोड शेतमजुराच्या मुलाने जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतुन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. जनार्दन सोना गळवे उर्फ जनार्दन तातोबा गळवे यांचे सुपुत्र असलेल्या राजेंद्र गळवे यांनी हे यश प्राप्त केले. राजेंद्र हे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.

गळवेवाडी या छोटय़ाशा गावातील जनार्दन तातोबा गळवे यांच्या आईचे बालपणीचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे चुलते आणि चुलती सोना गळवे आणि सिताबाई गळवे यांनी केला. जनार्दन गळवे व त्यांच्या पत्नी शकुंतला यांनी 17वर्षे ऊसतोड मजुर म्हणुन काम करत इतरांच्या ठिकाणी मोलमजुरी केली. आपल्या मुलांना शिक्षणाची कवडे खुली करून देत धडे दिले. जनार्दन गळवे यांचे सुपुत्र असलेले राजेंद्र उर्फ संजय हे 2007मध्ये मुंबई पोलीस दलात रूजु झाले.

बहिण विमल आणि मेव्हणे अशोक हिप्परकर यांच्या सहकार्याने राजेंद्र यांनी नोकरी करतानाच स्पर्धा परीक्षांमध्येही रूची ठेवली. त्यातुन लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक म्हणुन त्यांची निवड झाली. उपनिरीक्षक राजेंद्र गळवे यांचे मोठे बंधु सिताराम गळवे हे गळवेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष असुन आटपाडी एज्युकेशन सोसायटीमध्ये ते कार्यरत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातुन शिक्षणाच्या जोरावर पुढे येत सिताराम यांच्या पाठोपाठ त्यांचे लहानबंधु राजेंद्र उर्फ संजय यांनी गवाचा लौकिक वाढविण्याचे काम केले.

गळवेवाडीतील ऊसतोडणी मजुराच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदावर घेतलेली झेप कौतुकास्पद असुन गावासह आटपाडी तालुक्यातुन त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक सेवेतुन राजेंद्र उर्फ संजय गळवे यांनी हे यश मिळविले असुन त्यांच्या उपनिरीक्षक म्हणुन झालेल्या निवडीने वडील जनार्दन, आजोबा सोना व तातोबा गळवे यांच्यासह कुटुंबियांच्या कष्टाचे चिज झाल्याची भावना गळवेवाडी सोसायटीचे अध्यक्ष सिताराम गळवे यांनी व्यक्त केली. लवकरच गळवेवाडी येथे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गळवे यांच्या नागरी गौरव सोहळा आयोजित करण्याचा मनोदयही ग्रामस्थांनी बोलुन दाखविला.