|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » करगणीत वॉटर कपसाठी महाश्रमदान

करगणीत वॉटर कपसाठी महाश्रमदान 

प्रतिनिधी /आटपाडी :

आटपाडी तालुक्यातील करगणी येथे पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचा उत्साह वाढविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. करगणीसह परिसरातील व विविध भागातुन आलेल्या 700लोकांनी महाश्रमदानात सहभागी घेवुन जलसंधारणाच्या कामाला गती दिली. सरपंच गणेश खंदारे यांच्यासह पाणी फौंडेशनमध्ये काम करणारे तरूण मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी ही चळवळ गतीमान करण्यास योगदान दिले.

करगणी गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभागी होवुन श्रमदानाला सुरूवात केली आहे. प्रारंभीच्या सत्रात ठराविक तरूण मंडळीच श्रमदानात सहभागी होवुन आपल्यापरीने ठसा उमटवत होते. त्यामध्ये सरपंच गणेश खंदारे व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनीही सक्रियता दाखवुन ही चळवळ आणखी व्यापक केली. पाणी फौंडेशनतर्फे आण्णा सरगर, रमेश पवार, अनिल शिंदे, आबासो कांबळे, विठ्ठल माने, शरद पवार, किशोर पाटील व टीम पाणी फौंडेशनच्या सदस्यांनी महाश्रमदानासाठी लोकांना आवाहन केले.

करगणी ग्रामपंचायतर्फेही सरपंच गणेश खंदारे, ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनीही महाश्रमदान यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले. विविध गावचे लोक, विविध सेवाभावी संस्थांचे सदस्य व लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. सातशेहुन अधिक लोकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत सलग समतल चरीसह अन्य जलसंधारणाची कामे केली. विविध गावातुन आलेल्या श्रमदात्यांचा करगणीकरांच्यावतीने गौरव करण्यात आला.

ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, माजी जि.प.सदस्य तानाजी पाटील, माजी उपसभापती तानाजी यमगर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रमदात्यांचा गौरव करण्यात आला. सरपंच गणेश खंदारे, ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणी फौंडेशनमधील सक्रिय मंडळींच्या उपस्थितीत श्रमदात्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. वॉटरकप स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत करगणीतील श्रमदानाला बळकटी देण्यासाठी लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करगणी ग्रामपंचायत व पाणी फौंडेशन टीमच्यावतीने करण्यात आले.