|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मौजे डिग्रजमध्ये मगरीने बालकाला ओढून नेले

मौजे डिग्रजमध्ये मगरीने बालकाला ओढून नेले 

प्रतिनिधी /सांगली :

नदीच्या पाणवठय़ामध्ये पोहत असलेल्या बारा वर्षीय मुलावर मगरीने अचानक हल्ला चढवत त्याला जबडय़ात पकडून पाण्यात ओढून नेल्याची घटना मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे घडली. आकाश मारुती जाधव (वय 12, मूळ गाव निंबळक ता. इंडी जि. विजापूर. सध्या रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) असे या बालकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान आकाशचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.

मौजे डिग्रजजवळच ब्रम्हनाळकडे जाणाऱया रस्त्यालगत छोटा पाणवठा आहे. त्याच ठिकाणी अनेक वीट भट्टय़ा आहेत. वीटभट्टीवर काम करणाऱया मजुरांची कुटुंबे तिथेच राहण्यास आहेत. गुरुवारी सकाळी आकाशची आई कपडे धुण्यासाठी  नदीकाठी त्या पाणवठय़ावर गेली होती. आई कपडे धुण्यात मग्न असताना आकाश पाण्यात पोहत होता. त्याचवेळी आलेल्या मगरीने आकाशवर अचानक हल्ला केला. त्याला जबडय़ात पकडून नदीपात्रात ओढून नेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आकाशच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. वीटभट्टीवर काम करणारे मजूर त्या ठिकाणी धावत आले. मात्र तोपर्यंत मगर आकाशला घेऊन नदीपात्रात गेली होती.

नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱयांना दिली. अधिकारी व कर्मचाऱयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरडाओरडा सुरु असतानाही मगर आकाशला जबडय़ात घेऊन बिनधास्तपणे पाण्यात फिरत होती. यामुळे पाहणाऱयांच्या अंगाचा थरकाप उडाला. वनविभागाचे आर. एस. पाटील, वनक्षेत्रपाल मनोज कोळी, वनपाल साळुंखे यांच्यासह अधिकाऱयांनी बोटीच्या माध्यमातून मगरीचा पाठलाग केला तरीही ती जबडय़ातून आकाशला सोडायला तयार नव्हती.

अखेर वनविभागाने बोट मगरीच्या अंगावर घातल्यासारखे करताच मगरीने जबडय़ातील आकाशला सोडून दिले. मगरीने मुलाला जबडय़ातून सोडल्याचे लक्षात येताच कर्मचाऱयांनी आकाशचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु आकाश हाताला लागला नाही. दरम्यान, शोध युद्धपातळीवर सुरु झाल्यानंतर ती मगर काही वेळ गायब झाली. पण, पुन्हा तिने डोके वर काढत त्याच पसिरात फिरायला सुरु केल्याने शोध कार्यात अडथेळा निर्माण झाला. कुपवाड येथील आयुष हेल्पलाईन टीमचे पथक सायंकाळी 4 वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बोटीमधून आकाशचा शोध घेण्यास सुरूवात केली. यामध्ये अविनाश पवार, जमीर बोरगावे, मयूर शितोळे, किरण मंगसुळे व शिवराज साखळे यांनी शोधकार्यात सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. मात्र आकाश सापडला नाही. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.