|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कोल्हापूरच्या अनिश गांधीची तवारिया ट्रॉफीवर मोहोर

कोल्हापूरच्या अनिश गांधीची तवारिया ट्रॉफीवर मोहोर 

प्रतिनिधी /सांगली :

एस. एन. तवारियाजी जलद बुध्दिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत कोल्हापूरच्या अनिश गांधीने मिरजेच्या मुदस्सर पटेलचा पराभव करत 6.5 गुणांसह पाच हजार रुपये रोख पारितोषिकासह तवारिया ट्रॉफीवर मोहोर उमटवली. मुदस्सर पटेलची पाच गुणासह दहाव्या स्थानी घसरण झाली. अनिशला सांगली अर्बन बँकेचे संचालक संजय व सौ. वंदना धामणगावकर यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

येथील बापट बाल मंदीर येथे गुरुवारी जलद बुध्दिबळ स्पर्धा पार पडली. तलवारबाजी संघटनेचे संघटक आदित्य घोरपडे व राष्ट्रीय व्हॉलीबालपटू सुनयना घोरपडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे पटावरील चाल खेळून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत सांगलीसह सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई, लातूर, परभणी, पणजी आदी जिल्हयातील 76 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुण्याच्या किरण पंडीतरावने ठाणेचा गोपाळ राठोड यास बरोबरीत रोखत सहा गुणांसह तीन हजार रुपये पारितोषिकासह उपविजेतेपद पटकावले. गोपाळला 5.5 गुणांसह दोन हजार रुपये पारितोषिकासह तिसऱया स्थानावर जावे लागले. रेंदाळच्या श्रीराज भोसलेने डाव बरोबरीत सोडवत अर्ध्या गुणासह 5.5 गुण मिळवत एक हजार रुपये पारितोषिकासह चौथे स्थान पटकावले तर अभिषेकला सहाव्या स्थानावर जावे लागले. इचलकरंजीचा राहूल सामानगडकरने 5.5 गुणांसह पाचवा, मिरजेच्या अभिषेक पाटीलने 5.5 गुणांसह सहावा, इचलकरंजीच्या रविंद्र निकमने 5.5 गुणासह सातवे, कोल्हापूरच्या शार्विल पाटीलने पाच गुणासह आठवा, उत्कर्ष लोमटेने पाच गुणांसह नववा क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट खेळाडूंमध्ये आठ वर्षांखालील गटात अव्दैत फडके, गौरव बोहरा, शौया नंदेश्वर यांना, दहा वर्षाखालील गटात मानस गायकवाड, श्लोक शरणार्थी, विरेश शरणार्थी यांना तर 12 वर्षांखालील गटात सन्मित शहा, कार्तिक राजदान व अपूर्व देशमुख यांना गौरविण्यात आले. 14 वर्षांखालील गटात सारंग पाटील, केऊर साखरे व रजत नरदेकर यांना तर ज्येष्ठ खेळाडू म्हणून आनंदराव कुलकर्णी, शिरीष गोगटे, अविनाश चपळगावकर यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून दाक्षयाणी चव्हाण, श्रध्दा कदम व स्वराली हातवळणे यांना सन्मानित करण्यात आले. पंच म्हणून शार्दुल तपासे, सूर्याजी भोसले, उदय वगरे यांनी काम पाहिले. यावेळी स्मिता केळकर, डॉ. उल्हास माळी, चिंतामणी लिमये, कुमार माने उपस्थित होते.