|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » अष्टपैलू खेळाडू सर्वच संघांसाठी महत्त्वाचे

अष्टपैलू खेळाडू सर्वच संघांसाठी महत्त्वाचे 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

संघ कोणताही असो, सध्याच्या घडीला किमान दोन ते तीन स्पेशालिस्ट अष्टपैलू संघात असणे अतिशय महत्त्वाचे ठरत आले आहे. या अष्टपैलू खेळाडूंमुळे संघाचा उत्तम समतोल साधला जातो. अर्थात, असे अष्टपैलू खेळाडू फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर झुंजार खेळी साकारण्यासाठी तितकेच सक्षम असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मोहिंदर अमरनाथ यांनी केले. स्वतः मोहिंदर अमरनाथ हे भारताचे अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरले असून 1983 मधील आयसीसी वनडे विश्वचषक जिंकून देण्यात त्यांनी अर्थातच मोलाचा वाटा उचलला होता.

अमरनाथ यांनी मध्यमगती गोलंदाज या नात्याने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला आणि नंतर त्यांनी अव्वल जलदगती गोलंदाजांसमोर स्वतःला फलंदाजीतही सिद्ध करुन दाखवले. इंग्लंडमध्ये फारशा हिरवळीच्या विकेटस् दिसून येत नाहीत, त्यामुळे यावेळी फलंदाजांचा वरचष्मा राहण्याची जास्त शक्यता असल्याचा त्यांनी येथे उल्लेख केला.

‘इंग्लंडमधील हवामानाचा बराच फरक पडेल. पण, संघ समतोल असणे ही सर्वात महत्त्वाची बाब असेल. अव्वल दर्जाचा अष्टपैलू हा चौथा किंवा पाचवा गोलंदाज असावा, हे आवश्यक नाही. पण, तो तिसरा गोलंदाज असू शकतो, नियमित गोलंदाज असू शकतो. शिवाय, आघाडी फळीत फलंदाजी करण्यात त्याची हुकूमत असायला हवी’, असे मोहिंदर अमरनाथ याप्रसंगी म्हणाले.

69 कसोटी व 85 वनडे सामने खेळलेल्या मोहिंदरनी आपण खेळलो, तेव्हाचे क्रिकेट व आताचे क्रिकेट यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे यावेळी नमूद केले. 10 ते 40 षटकादरम्यान 30 यार्डाच्या सर्कलबाहेर कमाल चार खेळाडू तैनात असण्याची परवानगी असल्याने कर्णधारांना स्पेशालिस्ट फलंदाजांवर भर देत गोलंदाजीत पार्टटायमर्सवर अधिक विसंबून रहाणे कठीण जाते, याचा त्यांनी उल्लेख केला. अष्टपैलू खेळाडू असा असावा, ज्याने गोलंदाजीत दहा षटकांचा कोटा तर पूर्ण करावाच. पण, त्याही शिवाय, पहिल्या सहा फलंदाजात त्याचा समावेश असावा आणि त्याने त्या क्रमांकावर जोरदार फटकेबाजीही करावी, असे निकष मोहिंदर अमरनाथ यांनी येथे मांडले.

प्रत्येक दिवस रविवार असत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक लढतीत अष्टपैलू खेळाडू चमकतीलच असे नाही. पण, एकंदरीत त्यांच्या कामगिरीत सातत्याची झलक असावी आणि यासाठी त्यांनी खेळावर फोकस ठेवावा, वातावरण समजून घ्यावे आणि शक्य तितक्या चुका टाळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी मांडली.