|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेश क्रिकेट अकादमीमध्ये वासिम जाफर फलंदाज प्रशिक्षक

बांगलादेश क्रिकेट अकादमीमध्ये वासिम जाफर फलंदाज प्रशिक्षक 

वृत्तसंस्था /मुंबई :

भारताचा माजी कसोटीवीर तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक वर्षे मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करणारा 41 वर्षीय सलामीचा फलंदाज वासिम जाफरची बांगलादेश क्रिकेट मंडळाने ढाक्कातील क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली असल्याचे समजते.

बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून देण्यात आलेली ही ऑफर वासिम जाफरने स्वीकारली असून येत्या दोन आठवडय़ात जाफर या नव्या पदाची सूत्रे हाती घेणार असल्याचे समजते. ढाक्का प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अबाहानी लिमिटेड संघाकडून खेळण्यासाठी जाफर  15 दिवस बांगलादेशमध्ये होता. वासिम जाफरच्या मार्गदर्शनामुळे बांगलादेश फलंदाज सौम्या सरकारने ढाक्का प्रिमियर लीग स्पर्धेत द्विशतक आणि शतक झळकविले. वासिम जाफरला फलंदाजीचा चांगला अनुभव असून त्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत प्रथमश्रेणीमध्ये  40 हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. जाफरने 31 कसोटी आणि दोन sवनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. बांगलादेशच्या क्रिकेट अकादमीमध्ये जाफर वर्षांतील सहा महिने फलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे. बांगलादेशच्या क्रिकेट अकादमीमध्ये वासिम जाफर बांगलादेशच्या 19 वर्षाखालील, अ संघातील तसेच वरिष्ठ संघातील फलंदाजांना फलंदाजीचे मार्गदर्शन करणार आहे. दोन वर्षापूर्वी वासिम जाफरने विदर्भ संघाला रणजी आणि इराणी करंडक मिळवून देण्यामध्ये मोलाची कामगिरी केली होती.