|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुहेरी खून प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके

दुहेरी खून प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके 

प्रतिनिधी /बेळगाव :

कित्तूर जवळील एका पेट्रोल पंपवर झोपलेल्या दोन कामगारांचा भीषण खून करून पेट्रोलपंपमधील रोकड पळविण्यात आली होती. बेळगाव पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परराज्यातही ही पथके रवाना झाली आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून एका संशयिताचे छायाचित्र प्रसिद्धीस दिले आहे. विशेष पथकाकडून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हेगार परराज्यातील असणार असा संशय असून त्यामुळे शेजारच्या राज्यातही पोलीस पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी  तरुण भारतशी बोलताना दिली.

कित्तूरपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या शिवा पेट्रोलपंपावर मुस्ताक अहमद बिडी (वय 32 रा. तिगडोळी), मंजुनाथ पट्टणशेट्टी (वय 20 रा. लिंगदळ्ळी) या दोन कामगारांचा भीषण खून करून पेट्रोलपंपमधील रोकड पळविण्यात आली होती. बुधवारी हा थरारक प्रकार उघडकीस आला होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संशयितांची छायाचित्रे मिळविली आहेत. दुहेरी खूनाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून दोन कामगारांचा भीषण खून केल्यानंतर मारेकऱयांनी गल्ल्यातील रोकड पळविल्य़ाचे उघडकीस आले आहे. अशा घटना कर्नाटकातील इतर जिल्हय़ात किंवा परराज्यात घडल्या आहेत का? अशा प्रकारे गुन्हे करणाऱया टोळय़ा कोणत्या आहेत. याची संपूर्ण माहिती मिळविण्यात येत आहे.

यासंबंधी जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळ व सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांविषयी महत्त्वाची माहिती तपास अधिकाऱयांना मिळाली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास प्रगती पथावर असल्यामुळे त्याचे बारकावे जाहीर करता येणार नाहीत. लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळू असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.