|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कवठे-केंजळ, नागेवाडी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी

कवठे-केंजळ, नागेवाडी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी 

वार्ताहर /भुईंज :

वाई तालुक्यातील कवठे-केंजळ जलसिंचन उपसा योजनेसह नागेवाडी प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तावास मान्यता देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदन भोसले यांना दिली. या दोन प्रश्नांसह मदन भोसले यांनी सादर केलेल्या कामांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांनी जाग्यावरच संबंधितांना लेखी सूचना करीत सर्वच्या सर्व प्रश्न मार्गी लावले. 

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांची भेट घेवून वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासह किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. विशेषत: वाई, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती देवून अपेक्षित उपाययोजना राबविण्याबाबत विनंती केली. त्यासोबतच कवठे-केंजळ योजनेच्या सुधारीत प्रशासकीय प्रस्तावास मान्यता, नागेवाडी प्रकल्पाच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय प्रस्तावास मान्यता, वाई फुलेनगर येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची संरक्षक भिंत व पीर मुबारक दर्गा येथील दफनभूमीच्या पायऱयांसाठी निधीची उपलब्धता, उडतरे – खडकी ते कारखाना, भुईंज – भिरडाचीवाडी ते शिरगाव, निकमवाडी – जांब ते कारखाना, भुईंज – शिवथर ते पाडळी जळगाव, चाहूर ते गोवेदिगर, आसले ते पिराचीवाडी, चांदवडी ते मर्ढे, सर्जापूर – कळंभे ते विरमाडे आदी रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण तसेच देऊर, येथील श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयास विज्ञान शाखेची मंजुरी आदी कामांना मंजुरी देण्याबाबतची निवेदने मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केली. सर्वच्या सर्व कामांची पत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वत: वाचून त्या प्रत्येक पत्रावर कार्यवाहीच्या सूचना स्वत:च्या हाताने लिहून संबंधित विभागाकडे रवाना केली. सुमारे अर्ध्या तासाच्या या भेटीत मदन भोसले यांनी दुष्काळी परिस्थितीसह कवठे-केंजळ आणि नागेवाडी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. कवठे केंजळ योजनेचे काम अपूर्ण असल्याने अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. निधीची उपलब्धता झाल्यास हे प्रकल्प मार्गी लागतील, असे मदन भोसले यांनी सांगताच मुख्यमंत्र्यांनी प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.