|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विनोद कुलकर्णी यांना गो. मा. वाघमारे पुरस्कार

विनोद कुलकर्णी यांना गो. मा. वाघमारे पुरस्कार 

प्रतिनिधी /सातारा :

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभलेले आदर्श शिक्षक व अभ्यासू पत्रकार गो. मा. वाघमारे यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला ‘गो. मा. वाघमारे स्मृती पत्रकारिता पुरस्कार’ सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना घोषित केल्याची माहिती
गो. मा. वाघमारे ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. मंगलताई गायकवाड व कार्यवाह साहित्यिक अरुण जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व आमदार शिवेंद्रराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि भारतीय संविधान असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गो. मा. वाघामारे  यांच्या जन्मदिनी उद्या 18 रोजी सायंकाळी 5.30 वाजता छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालय, पाठक हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

एका हातात खडू आणि एका हातात मूल्य घेऊन आदर्शाची पेरणी करणारा समाजशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. कमी वयामध्ये विनोद कुलकर्णी यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त, अन् मेहनतीने पत्रकारितेसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच बँकिग, सहकार यामध्ये यशस्वी वाटचाल केलेली आहे.

सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱयांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार असून पत्रकारिता, पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण या विषयावर ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. असेही डॉ. गायकवाड व कार्यवाह साहित्यिक अरुण जावळे यांनी सदर पत्रकात स्पष्ट केले आहे.