|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुक्या जीवांचे कडक उन्हात हाल

मुक्या जीवांचे कडक उन्हात हाल 

अमर वांगडे /परळी :

सध्या दुष्काळाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. त्यातच सोशल मिडीयावर प्राण्यांविषयीचा कळवळा व्यक्त करणारे ‘पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरत असले तरी संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, याचा प्रत्यय येत आहे.

पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चाललेले असतात. एप्रिल मे महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते. पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे गरज आहे ती आपणही पक्षीमित्र बनण्याची. पाणी आणि अन्नासाठी पक्ष्यांना मदत करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी, अन्न आणि निवाऱयाची व्यवस्था करावीच लागेल. 

आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. विविध जागतिक दिन केवळ नावापुरतेच आहेत का? असा प्रश्न पडावा. ते शोपुरतेच साजरे करण्यापेक्षा वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे, झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्या वन्य प्राण्यांना जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ‘पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.