|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचरा वर्गीकरणासाठी मडगाव नगरपालिकेचे जोरदार प्रयत्न

कचरा वर्गीकरणासाठी मडगाव नगरपालिकेचे जोरदार प्रयत्न 

प्रतिनिधी /मडगाव :

कचऱयाचे वर्गीकरण व्हावे याकरिता वैद्यकीय कचऱयासंदर्भात भारतीय वैद्यकीय संघटनेशी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेलवाल्यासमवेतही बैठक घेतली जाणार आहे. या बैठका येत्या आठवडय़ात होतील, अशी माहिती मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कचरा वर्गीकरणासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांसमवेत बोलणी करण्यात आली असून त्यांच्या बाबतीत यश मिळू लागले आहे. नुकतीच मुख्याधिकाऱयांनी हॉटेलांची पाहणी केली होती आणि ज्यांनी वर्गीकरण केलेले नाही अशा हॉटेलांतील कचरा उचलला नव्हता. त्यामुळे सदर हॉटेल्स आता कचऱयाचे वर्गीकरण करू लागलेली आहेत, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज यांचीही उपस्थिती होती.

मडगाव पालिकेने 100 किलोंहून जास्त कचरा दिवसाकाठी निर्माण होणारी दुकाने व इतरांना तीन गटांमध्ये कचऱयाचे वर्गीकरण करावे अशी सूचना याआधीच केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते तसेच अन्य सरकारी कर्मचाऱयांच्या वसाहतींना त्याअंतर्गत कचरा वर्गीकरण करण्यास सांगितले जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑम्लेट-पाव, भेळपुरी यांच्या गाडय़ांनाही कचऱयाचे वर्गीकरण करण्यास सांगितले जाणार आहे. त्यांच्याकरिता गरज पडल्यास रात्रीची कचरा उचलण्याची सेवा दिली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जागृतीत कमी पडल्याचे मान्य

ज्या प्रभागांत कचरा उचल मोहीम खासगी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे तेथील 40 टक्के कचरा वर्गीकरण करून मिळत आहे, असे सांगून नगराध्यक्षा प्रभुदेसाई यांनी आवश्यक जागृती करण्यात मडगाव पालिका कमी पडली असल्याचे मान्य केले. आता प्रभावी जागृती करण्यात येणार असून त्याकरिता एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा उपयोग केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आवश्यक साहित्याची पालिकेला उणीव भेडसावत आहे. घरोघरी कचरा उचल मोहिमेकरिता 2600 मोठय़ा कचरापेटय़ा आणि 20 हजार छोटय़ा कचराकुंडय़ा पालिकेने मागितल्या होत्या. पण त्या अजूनही मिळू शकलेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.