|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे सरकार यावे!

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे सरकार यावे! 

राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांची अपेक्षा

कणकवली:

विद्यमान केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत जनतेच्या मुलभूत प्रश्न, समस्यांकडे दुर्लक्ष करीत केवळ जाती-धर्माच्या नावावर, स्वार्थाचे राजकारण केले. या हिटलरवादी, मनुवादी सरकारमार्फत संविधानाने दिलेल्या अधिकारावरच गदा आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच आता येणारे सरकार हे देशाचे हित साधणारे, प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे असावे, अशी अपेक्षा राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केली.

गोपुरी आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत नदाफ बोलत होते. यावेळी शहाजी गोंगाणे, वैभव कोराणे, महेश बिटिगरे, सुप्रिया कांबळे, कवयित्री सरिता पवार, उपक्रमशील शिक्षक हरिश्चंद्र सरमळकर, राजन चव्हाण आदी उपस्थित होते.

देश अखंड ठेवणारे सरकार हवे!

नदाफ म्हणाले, येणारे नवे सरकार हे संविधानाच्या विरोधी असता कामा नये. त्यांनी जात, धर्म, देवाचे नाव घेऊन कारभार करण्यापेक्षा जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवावेत. देशाला अखंड ठेवणारे सरकार आवश्यक असून नव्या सरकारने शेतकरी, शिक्षण, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार असे प्रश्न सोडवून देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळवून द्यावा.

देश धर्मनिरपेक्ष विचारांनी चालावा!

आज जात-जमातवाद, धर्मवादाचा प्रश्न भेडसावत आहे. राष्ट्र आणि राष्ट्राची संकल्पना चुकीच्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडली जात आहे. इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. जात, धार्मिक अस्मिता चुकीच्या पद्धतीने टोकदार केली जात आहे. अशावेळी जनतेचे मुलभूत प्रश्न बाजूलाच पडत असून देशाच्या सार्वभौम राष्ट्रवादाला, लोकशाही आणि समतेच्या विचाराला आव्हान दिले जात आहे. संविधानविरोधी व्यवस्था डोके वर काढत आहे. म्हणूनच जाती, धर्माच्या पलिकडे जाऊन लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारांनी देश चालला पाहिजे, असे नदाफ म्हणाले.

माणूस घडविण्यासाठी राष्ट्रसेवा दल कार्यरत!

राष्ट्रसेवा दलाच्या उपक्रमांविषयी माहिती देताना नदाफ म्हणाले, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, महिला, बचतगट, शेतकरी, मजूर, असंघटित कामगार या सर्वांना अशा विचारांच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रसेवा दल गेली 78 वर्षे कार्यरत आहे. यात वर्षभरात सांस्कृतिक, बौद्धीक, श्रमदान शिबिरे होत असतात. स्थानिक प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग कसा घेता येईल, याचेही प्रशिक्षण राष्ट्रसेवा दल तरुणांना देत असते. बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्टय़ा विचार देऊन चांगला माणूस घडविणे हाच राष्ट्रसेवा दलाचा उद्देश असल्याचेही नदाफ म्हणाले.

सक्षम सरकार मिळेल!

विद्यमान सरकारने पाच वर्षांत सर्वसामान्य माणसासह प्रत्येक वर्गाची गळचेपी केली. याची नागरिकांसह देशातल्या प्रादेशिक पक्षांना चीड आहे. परिणामी हे सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन नवे सक्षम सरकार देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे देशाला चांगले सरकार प्राप्त होऊ शकेल, असा विश्वासही नदाफ यांनी व्यक्त केला.