|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ठेवावे!

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ठेवावे! 

मालवणातील मच्छीमारांचे मत्स्य आयुक्तांना निवेदन

वार्ताहर / मालवण:

कोकण कृषी विद्यापीठ मत्स्य शिक्षणासाठी मच्छीमारांना 70 टक्के जागा देते. नागपूरचे विद्यापीठ असे आरक्षण देत नाही. मच्छीमार समाजातील लोक शिक्षणात प्रगती करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांच्या प्रगतीच्या काळात शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचे नियंत्रण नागपूरसारख्या दूरच्या विद्यापीठाकडे दिल्यास मच्छीमारांच्या विकासावर अनिष्ठ परिणाम होणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ठेवावे, अशा आशयाचे निवेदन मालवणातील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना दिले आहे. यावेळी मेघनाद धुरी, जॉन नऱहोना, गंगाराम आडकर, सुनील खांदारे, विकी चोपडेकर, रमेश मेस्त, दिलीप घारे, बंटी रेवंडकर, सेलेस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.

राज्यातील 75 टक्के मत्स्य व्यवसाय कोकणात आहे. संपूर्ण देशाला कोकण सुकविलेले, खारवलेले आणि ताजे मासे पुरवितो. महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाच्या विकासात कोकण कृषी विद्यापीठातील शिरगाव, रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय, सागरी जीवशास्त्राrय संशोधन केंद्र यांचा महत्वाचा वाटा आहे. कायदेविषयक त्रुटीमुळे रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय आणि संशोधन संस्था नागपूरस्थित विद्यापीठाला संलग्न करण्याचे विचार शासन दरबारी सुरू असल्याचे समजते. त्याला सर्व मच्छीमारांचा विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

माफसू कायद्यात सुधारणा करावी!

2008 मध्ये ‘पदुम’ मंत्र्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना शासनाची भूमिका स्पष्ट केली होती. 2000 व 2008 मध्ये विधानसभेतील चर्चेपश्चात कायद्यातील त्रुटीच्या आधारावर मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी माफसू अधिपत्याखाली स्थलांतरित करण्याचे उपद्व्याप माफसूकडून करण्यात येतात. त्यामुळे माफसू कायद्यात सुधारणा कराव्यात. कोकण कृषी विद्यापीठाने 2000 ते 19 पर्यंत दिलेल्या मत्स्य व्यवसाय पदव्या पूर्वलक्षी प्रभावाने वटहुकुमाद्वारे कायदेशीर कराव्यात व कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्य व्यवसाय विषयात पदवी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.