|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पश्चिम त्रिपुराला वादळाचा तडाखा

पश्चिम त्रिपुराला वादळाचा तडाखा 

382 पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त : वृक्षांसह वीज खांब उन्मळून पडले

वृत्तसंस्था /  आगरतळा

पश्चिम त्रिपुरा जिल्हय़ामध्ये बुधवारी रात्री आलेल्या वादळामुळे आणि मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. यामध्ये तीनशेपेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली असून, शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच विजेचे खांब, वाहिन्याही कोसळल्याने बहुतांशी भागात काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हय़ातील अनेक ठिकाणी महापूर आला असून, जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख सरत दास यांनी दिली. आगरतळा महापालिका क्षेत्रातील अनेक भागात पाणी साचले असून, 382 घरांचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.

राज्याचे मुख्य सचिव एल. के. गुप्ता यांनी वरि÷ अधिकाऱयांसह पश्चिम त्रिपुरातील वादळामुळे प्रभावित झालेल्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे, स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

पश्चिम त्रिपुरातील प्रत्येक हालचालीवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. विजेच्या खांबावर झाडे उन्मळून पडल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, वीजपुरवठा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत.   त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी अधिकाऱयांशी संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. बुधवारी सरासरी 19.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आणखी काही दिवस वादळी वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.