|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शारदा चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी राजीव कुमार यांना अटक शक्य

शारदा चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी राजीव कुमार यांना अटक शक्य 

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठविली : 7 दिवसांची अखेरची मुदत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणाची शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेली स्थगिती उठविण्यात आली. मात्र, कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तरीही नजिकच्या काळात त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चिटफंड गैरव्यवहाराच्या प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची मुदतही दिली आहे. पुढील सात दिवसांमध्ये राजीव कुमार यांना संबंधित न्यायालयात जाता येईल किंवा या कालावधीपर्यंत 5 फेब्रुवारी रोजी अटकेला दिलेली स्थगिती कायम राहील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कुमार यांना स्वसंरक्षणार्थ कायदेशीर पावले उचलावी लागणार आहेत.

चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱयांना पोलिसांनी एका गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेल्याची घटना घडली होती. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने 5 फेब्रुवारी रोजी निर्णय देताना कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले. पण राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर हजर राहून चौकशीत सहकार्य करावे, असे आदेश सरन्यायाधीशांनी दिले होते. या प्रकरणात काही बडय़ा लोकांना वाचविण्यासाठी राजीव कुमार यांनी पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. याबाबत अधिक तपास सुरू असून राजीव कुमार यांच्यासह अन्य संशयितही तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती तपास यंत्रणांनी
दिली.