|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निष्पाप मुलांसह गर्भवती मातेची हत्या

निष्पाप मुलांसह गर्भवती मातेची हत्या 

जमिनीच्या वादातून बिहारमध्ये हत्याकांड : चार संशयितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

अररिया

जमिनीच्या वादातून हत्याकांडाच्या घटनेने बिहारमधील बैरगाछी क्षेत्रातील अररिया पंचायतच्या माधोपाडा गावात खळबळ पसरली आहे. गुन्हेगारांनी क्रृरतेच्या मर्यादा ओलांडत गुरुवारी मध्यरात्री घरात घुसून तीन बालकांसह मातेचा गळा चिरून हत्या करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माधोपाडा गावात गुरुवारी मध्यरात्री एकाच कुटुंबातील चार जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यात आरोपींनी गर्भवती महिलेच्या पोटात चाकू घुसवल्याचेही स्पष्ट झाले आहे. माधोपाडा गावातील रहिवाशी आलम रात्री शौचालयासाठी घरातून बाहेर गेला होता. त्याचदरम्यान काहीजण त्याच्या घरात घुसले आणि त्याची पत्नी तबस्सुम (वय 30), समीर (वय 4), आलिया (वय 6), आणि शब्बीर (वय 8) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. आरडाओरड झाल्यानंतर जवळपासचे लोक घटनास्थळी पोहोचले मात्र, गुन्हेगार घराच्या तुटलेल्या खिडकीतून पसार झाले, असे पोलीस अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

या घटनेच्यामागे जमिनीचा वाद असल्याचे सांगण्यात आले असून आलम यानेही जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. परंतु मृत महिलेच्या पतीची ही भूमिका संशयास्पद असल्याचे अररियाचे पोलीस उपाधीक्षक के. डी. सिंग यांनी शुक्रवारी सांगितले.

मृत महिलेच्या पतीकडून दिलेल्या जबाबानुसार बैरगाछी पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये माधोपाडा गावातील चार जणांना संशयित आरोपी बनविण्यात आले आहे. पोलीस आरोपींना पडकण्यासाठी छापा टाकत असून याप्रकरणी पूर्णपणे तपास सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.