|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रचारतोफा थंडावल्या

प्रचारतोफा थंडावल्या 

अखेरच्या टप्प्याचे उद्या मतदान : 23 मे रोजी निकाल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाचे राजकीय भवितव्य घडविणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्यापासून धडाडणाऱया प्रचार तोफा अखेर शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. सातव्या व अखेरच्या टप्प्यामध्ये सात राज्यांतील 59 मतदारसंघांत रविवार, 19 रोजी मतदान होणार आहे. यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. याच दिवशी आंध प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर होईल.

  लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल ते 12 मे या कालावधीत एकूण सहा टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता अखेरच्या टप्प्यासाठी सात राज्यांमधील प्रचार सभांमध्ये सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी सहभाग नोंदवला होता. पश्चिम बंगालमधील अमित शहांच्या रॅलीवेळी झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. पश्चिम बंगालमधील 9 मतदारसंघांतील प्रचार मुदतपूर्व एक दिवसआधी बंद करण्याचे आदेश दिले. तर उर्वरित 50 मतदारसंघातील प्रचार शुक्रवारी संपला. आता रविवारी सात राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. आता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा, सनी देओल, रविकिशन यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

सात टप्प्यात मतदान होणारी राज्ये कंसात मतदारसंघ : पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9), बिहार (8), मध्य प्रदेश (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), चंदीगड (1).   

पश्चिम बंगालमध्ये कडेकोट सुरक्षा

कोलकातामधील भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोला हिंसक वळण लागले.याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने राज्यातील प्रचार मुदतपूर्व एक दिवस आधी थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच रविवारी मतदान होणाऱया 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. निमलष्करी दलाच्या तब्बल 800 तुकडय़ा तैनात केल्या जातील, असे गुरुवारी प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. मतदानाच्या मागील सहा टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या 300 घटनांची नोंद झाली आहे. यासंदर्भात राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे. नागरिकांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात केली जाणार असल्याचेही प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.