|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पुन्हा ‘रालोआ’चेच सरकार !

पुन्हा ‘रालोआ’चेच सरकार ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा : अमित शहांनी वाचला योजनांचा पाढा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रालोआप्रणित सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकारच सत्तेत येणार असल्याचा दावा केला. बहुमत मिळून रालोआ सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबाबत समाधान व्यक्त करत ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपला बहुमत मिळाले तरी सरकार ‘रालोआ’चेच असेल असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले. भारत हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. विविधतेतून एकतेच्या माध्यमातून भारताने जगावर छाप पाडली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता हेच मी मानतो. आम्हाला जनतेचा आशीर्वाद हवा आहे असे सांगत आम्ही देशातील प्रत्येक माणसापर्यंत सरकारी योजना पोहचवल्याचा आम्हाला गौरव वाटतो, असेही मोदींनी नमूद केले. देशाच्या जनतेचा कौल काय येईल ते 23 तारखेला स्पष्ट होईल. पण आम्ही देशाच्या विकासाचे निर्णय घेतल्यामुळे जनता आम्हालाच पुन्हा सत्ता बहाल करेल असे मोदी म्हणाले.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याबाबत पत्रकार परिषदेत विचारणा केली असता मोदींनी अमित शहा उत्तर देतील असे सांगत ‘मी तर डिसिप्लीन सोल्जर आहे, अध्यक्ष आमच्यासाठी सर्वकाही आहेत’ असे स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात सर्व सण, रामनवमी, इस्टर, रमजान, मुलांच्या परीक्षा, आयपीएल होत आहे, ही देशाची ताकद आहे, असेही मोदींनी पुढे स्पष्ट केले.

अमित शहांची मोदींवर स्तुतीसुमने

पंतप्रधानांप्रमाणेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही बहुमताचा दावा केला. गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी लोकांचे परिश्रम आमच्यापेक्षा जास्त दिसून आले. नरेंद्र मोदी प्रयोगाला जनतेने स्वीकारले असून गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त बहुमताने मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे शहा म्हणाले. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने 133 योजना कार्यन्वित करण्याचा प्रयत्न केला. या योजनांच्या अंतर्गत देशात विकासाची गंगा वाहत आहे, असेही ते म्हणाले.

भाजपची आता देशात 16 राज्यांत सत्ता आहे. भाजपाने गरीब जनतेला घर, वीज, शौचालय, पाणी देऊन देशाच्या विकासात गरिबांचे स्थान आहे याची खात्री त्यांना दिली. सर्व लोकांना मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश सुरक्षीत आहे अशी लोकांची भावना आहे. शेतकऱयांच्या विकासासाठी, महिलांसाठी आमच्या सरकारने काम केले आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेले काम आणि त्यांची लोकप्रियता यामुळे आमच्या पक्षाला भरपूर नवे स्वयंसेवक मिळाले हे या निवडणुकाचे वैशिष्टय़ असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले.