|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जनताच 23 मेला फैसला करेल

जनताच 23 मेला फैसला करेल 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक निकालाच्या पाच दिवसआधी पंतप्रधान काही निवडक पत्रकारांनाच घेऊन बंद खोलीत पत्रकार परिषद घेतात. त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीत, असे आव्हान देत आता देशातील जनताच 23 मे रोजी फैसला करेल. त्यामुळे यापूर्वी देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार याबाबत बोलणे चुकीचे ठरेल, असे प्रत्युत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालाआधी पाच दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे संयुक्त पत्रकार परिषद घेतात हेच आश्चर्यकारक आहे. त्यांनी बंद खोलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही पत्रकारांना प्रवेशच नाकारण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. आता देशातील जनताच 23 मे रोजी फैसला करेल. त्यामुळे यापूर्वी देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार याबाबत मी बोलणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

 केंद्रीय निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षपाती भूमिका घेतली. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर कोणतीही कारवाई झाली नाही; पण विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली. निवडणूक कार्यक्रमच नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आला होता. आम्ही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला. तर भाजपने या निवडणुकीत अतोनात पैसा, दूरचित्रवाहिन्यांचा वापर केला तर आमच्याकडे केवळ सत्य होते, असा दावाही त्यांनी केला. 

महत्त्वाच्या प्रश्नांवर मोदी निरूत्तर

राफेल विमान खरेदी गैरव्यवहार, नोटाबंदी, वाढलेली बेरोजगारी, शेतकऱयांची दुरवस्था, ढासळलेली अर्थव्यवस्था, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, बालाकोटमधील कारवाई अशा देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उत्तरच दिले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या वडिलांवर आरोप केले. आमच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर त्यांनी टीका केली. मात्र मी पंतप्रधानपदाचा आदर करतो. नरेंद्र मोदी यांच्या आईवडिलांचा आदर करतो. मी व्यक्तिगत टीका करणार नाही. त्यांनी केलेल्या व्देषाला मी प्रेमानेच उत्तर देईन, असेही त्यांनी नमूद केले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र आम्ही अत्यंत प्रभावीपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावली. नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची ग्वाही दिली होती. मात्र पाच वर्षांनी सर्वत्र ‘चौकीदार’ हा शब्द उच्चारला तरी ‘चोर है’ हेच उत्तर मिळेते, असा टोलाही त्यांनी लगावला.