|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » औंधच्या वस्तुसंग्रहालयाची लाखो पर्यटकांना आजही भुरळ.

औंधच्या वस्तुसंग्रहालयाची लाखो पर्यटकांना आजही भुरळ. 

फिरोज मुलाणी/ औंध

औंध संस्थानचे कलाप्रेमी राजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधीं यांच्या दुरदृष्टीतून उभारलेल्या आणि  अनेक कलातपस्वींच्या कुंचल्यातून साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीचा नजराना डोळयात साठवण्यासाठी आजही लाखो पर्यटकांना औंधच्या वस्तुसंग्रहालयाची भुरळ पडत आहे. त्याचबरोबर रामभरोसे सुरक्षा असलेल्या अमुल्य साहित्याच्या सुरक्षिततेच्या द्रुष्टीने पुरातत्व खात्याने कोटय़वधी रुपयांचा खर्च करून  दोनशे हून अधिक नाईट व्हिजन  कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

शासनाच्या पुरातत्व विभागाने राज्यातील बारा वस्तुसंग्रहालयापैकी पाच वस्तुसंग्रहालयांमधील मौल्यवान वस्तू, चित्रे,पेंटिंग्ज व अन्य साहित्याच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कँमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औंध येथील श्रीभवानी वस्तूचित्रसंग्रहालय व ग्रंथालय परिसर व आतील दालनांमध्ये सुमारे दिड कोटी रुपये खर्चून दोनशे तीस नाईट व्हीजन कँमेरे बसविण्यात आल्याने येथील मूळपीठ डोंगरावरील संग्रहालय सुरक्षिततेच्याद्रुष्टीने एक पाऊल पुढे गेले आहे.

  याबाबत अधिक माहिती देताना औंध येथील श्रीभवानी चित्र व वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयाचे उपअभिरक्षक उदय सुर्वे यांनी सांगितले राज्यात एकूण बारा वस्तुसंग्रहालये आहेत. यामधील पाच संग्रहायांमध्ये नाईट व्हीजन कँमेरे बसविले जाणार आहेत. त्यामध्ये नागपूर ,औंध,सांगली व कोल्हापूर येथील वस्तू व चित्रसंग्रहालयांमध्ये हे कँमेरे बसविले जाणार आहेत. त्यामध्ये औंध येथील  संग्रहालयात सर्वसाधारणपणे दिड कोटी रुपये खर्चून  दोनशे तीस नाईट व्हिजन कँमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संग्रहालय परिसरातील अंतर्गत व बाहय परिसर सुरक्षित झाला आहे. ,संग्रहालयामधील एकूण अठरा दालनांमध्ये प्रत्येकी चार कँमेरे बसविण्यात असे एकूण बहात्तर कँमेरे बसविण्यात आले आहेत.

 त्याचबरोबर दोन कोर्ट यार्ड व एका मोठय़ा हाँलमध्ये असे एकूण तीस कँमेरे बसविण्यात आले आहेत .त्याचबरोबर स्ट्राँग रुम,आँफिस,बाहेरील आँफिस,स्टोअर रुम,व्हरांडा, संग्रहालय इमारतीमधील दोन्ही गँलर्यांमध्ये सुमारे पंचाहत्तर कँमेरे तसेच संग्रहालयाच्या बाहय  परिसरातील पुढील व मागील बाजूस दोन मोठे डोम कँमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संग्रहालय बाहय परिसरासह संग्रहालयाच्या दोन्ही इमारतींमधील सुमारे सहा हजार दुर्मिळ चित्रे,पेंटिंग्ज, शिल्पे, चंदनी वस्तू तसेच विविध प्रकारच्या हस्तीदंती,संगमरवरी वस्तूंचे संरक्षण होण्यास मोठय़ा प्रमाणात मदत होणार आहे. त्याचबरोबर अठरा हजार ग्रंथसंपदा ही सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. हे सर्व कँमेरे चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. याबाबतचे सर्व काम पूर्ण झाले आहे. कँमेरे आँपरेट करण्यासाठी संग्रहालयाच्या प्रवेशद्वार,उपअभिरक्षक कार्यालय, बाहय कार्यालय येथे प्रत्येकी एक  क्रीन तसेच संग्रहालयाच्या मध्य भागातील कंट्रोल केबिनमध्ये चार क्रीन बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संग्रहालय कर्मचारी व सिक्युरिटी गार्डवरील ताण फार मोठय़ा प्रमाणात कमी झाला आहे.   यामुळे संग्रहालय पूर्णपणे सुरक्षित झाले असून सीसीटीव्ही यंत्रणा मागील काही दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

     औंधच्या वस्तुचित्रसंग्रहालयात, अनमोल कलाकृतीचा, अमुल्य खजिना पाहण्यासाठी दरवर्षी राज्यासह देश विदेशातून अंदाजे दोन लाख पर्यटक भेट देतात. संग्रहालय पाहण्यासाठी तिकीटाच्या माध्यमातून  पुरातत्व विभागाला अंदाजे चार साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

      बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी उभारलेल्या संग्रहालयात जागेच्या अडचणीमुळे अनेक चित्रांना पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने काही कलाकृती अडगळीला पडल्या होत्या. मात्र संस्थानचा दैदिप्यमान वारसा जपण्यासाठी औंध संस्थानच्या स्नुषा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यानी पुढाकार घेऊन कोटय़वधी रुपयांचा निधी खेचून आणल्यामुळे संग्रहालयाची विस्तारित इमारत उभी राहिली आहे. तसेच अनेक कलाकृतीना पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. 

 या संग्रहालयात अंदाजे अडीच हजारहुन अधिक पेंटिंग्ज आहेत. मात्र वातावरणातील परिणाम काही कलाकृती वर होत असतो ही बाब लक्षात घेऊन पुरातत्व खात्याने या खराब झालेल्या पेंटिंग्ज ची आयुष्यमर्यादा वाढवण्यासाठी सध्या संग्रहालयातील पेंटिंग्ज वर  मूळ रंगाना कोणताही धक्का न लावता केमिकल ट्रीटमेंट सुरु केली आहे. या प्रक्रियेचा एक टप्पा पुर्ण झाला आहे. पुढील काळात उर्वरित पेंटिंग्ज वर ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.