|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सीसीटीव्हीचा निर्णय अडकला लालफितीत

सीसीटीव्हीचा निर्णय अडकला लालफितीत 

शासनाच्या उच्चस्तरीय समितीची घ्यावी लागणार परवानगी

प्रतिनिधी/ सातारा

पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवण्याचा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला होता. मात्र तो आता शासनाच्या लालफितीत अडकला आहे. शासनाच्या उच्चस्तरीय समितीची परवानगी घेतल्याशिवाय सीसीटीव्ही बसवू नयेत, या नव्या निर्णयामुळे पालिका व पोलीस प्रशासनाची अडचण झाली आहे.

  नियोजन भवनातील एका बैठकीत महिला व युवतींच्या सुरक्षितेसाठी सातारा शहरातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी सातारकरांनी केली होती. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. या सुचनेला सर्वांनी एकमुखाने मान्यता दिली होती. तसेच पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पुढाकार घेवून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पोलीस व पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. यांची अंमलबजावणी करत पालिका व पोलिसांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी अंतिम टप्प्यात असतानाच मध्यंतरी शासनाच्या नवीन निर्णय घेतला. प्रशासकीय पातळीवरून अधिकाऱयांनी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. या उच्चस्तरीय समितीत महसूल व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांचा समावेश करण्यात आला आहे.

  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापूर्वी या उच्चस्तरीय समितीची परवानगी घेऊनच संबंधित यंत्रणा बसवावी, असे म्हटले आहे. या निर्णयामुळे सातारा शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यापूर्वी या समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडून तसे पत्रही पालिकेला पाठविण्यात आले आहे. या नवीन शासन निर्णयामुळे सातारा शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा अंतिम टप्प्यात असलेला प्रस्ताव पुन्हा एकदा लालफितीत अडकला आहे. पालिकेला या समितीची परवानगी घेऊन प्रस्ताव पुढे ढकलावा लागणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयामुळे महिला व युवतींच्या सुरक्षिततेसोबतच गर्दीच्या वेळी चेनस्नॅचिंग, पाकिटमारी करणाऱयांवरही नजर ठेवता येणार आहे. मात्र सदर प्ररकरण लालफितीत अडकल्याने भुरटय़ा चोरांना एकप्रकारे सूट मिळाली आहे.