|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » एसपींची गाडी ओव्हरटेक करताना भिषण अपघात

एसपींची गाडी ओव्हरटेक करताना भिषण अपघात 

प्रतिनिधी/ सातारा

17 रोजी सकाळी येथील रिमांड होम (बाल सुधारगृह) समोर होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन संबंधित गाडीतील युवक जुन्या आरटीओ चौकाकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट वीज वितरण कंपनीच्या डीपीला जावून धडकली. या अपघातात गाडीतील युवक जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी तत्काळ गाडीतील जखमी युवकांना बाहेर काढले. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांच्या तत्परतेचे सातारा शहरात कौतुक होत आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साताऱयातील प्रणव संजय कुलकर्णी, सुरज मगर, कुमार जलवाणी हे युवक सदरबझारमधून जुना आरटीओच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, याचवेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते आपल्या शासकीय गाडीतून पोलीस परेडसाठी पोलीस परेड ग्राऊंडकडे निघाल्या होत्या. दरम्यान, रिमांड होमसमोर जिल्हा पोलीस प्रमुखांची गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात होंडा सिटी कार क्र. एमएच 11 बीएस 6831 या गाडीतील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ती गाडी रस्त्याच्या तिकाटण्यावर असलेल्या वीज वितरणच्या डीपीवर जावून धडकली. ही धडक एवढी भीषण होती की या गाडीने डीपीच्या अक्षरश: चिंध्या केल्या. गाडीची धडक बसल्यानंतर गाडी पलटी झाली. दरम्यान, अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते व त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना त्वरित कारमधून बाहेर काढले व त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.