|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला

उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला 

प्रतिनिधी/ नागठाणे

ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर शेंद्रे (ता.सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील उड्डाणपुलाचे लोखंडी बॅरिकेट तोडून बारा चाकी कंटेनर ट्रक सेवारस्त्यावर आदळून झालेल्या अपघातात चालक मच्छिंद आबासाहेब चितळे (वय 24 रा. धनगरवाडी, माणिकदौंडी,जि. अहमदनगर) गंभीर जखमी झाला. सुदैवाने सेवारस्त्यावर अन्य वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी महामार्गावरून कोल्हापूरहून पुणे बाजूकडे एक बारा चाकी कंटेनर ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. अजिंक्यतारा साखर कारखान्यापुढे शेंद्रे गावच्या मोठय़ा उड्डाणपुलावरून हा कंटेनर ट्रक निघाला असतानाच अचानक हा ट्रक उड्डाणपुलावरील असणारे लोखंडी सुरक्षा कठडा तोडून सुमारे 150 फूट उंचावरून महामार्गाच्या पश्चिम बाजूच्या सेवारस्त्यावर जोरात आदळला. यामध्ये ट्रकच्या केबिनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात चालक चितळे गंभीर जखमी झाला असून येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जोराचा आवाज झाल्याने ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तत्काळ जखमी चालकास बाहेर काढून रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

सुदैवाने कंटेनर ट्रक सेवारस्त्यावर आदळत असताना सेवारस्त्यावर इतर वाहने नव्हती, अन्यथा जीवितहानी होण्याची शक्यता होती. अपघात नेमका कसा झाला याबाबत ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा होती.

 अपघातस्थळी कराड महामार्ग पथकाच्या सपोनि अस्मिता पाटील,सहाय्यक फौजदार हणमंत शिंदे, सचिन घोरपडे, शिंदे, हायवे बिट 8 चे पोलीस जवान किरण पवार, महिला पोलीस बनसोडे, हायवे हेल्पलाईन कर्मचारी व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत दोन क्रेनच्या साहाय्याने कंटेनर ट्रक सेवारस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम सुरू होते.