|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पर्ससीन ट्रॉलर संघटनाध्यक्षांचा राजीनामा

पर्ससीन ट्रॉलर संघटनाध्यक्षांचा राजीनामा 

पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार : ‘आपणच आपल्या घराला आग लावल्याची भावना!’

  • आमच्यातीलच काहींकडून एलईडी मासेमारी सुरू!
  • रापणकर मच्छीमारांना मासळीच मिळत नाही!
  • एलईडीच्या बेछूट मासेमारीमुळे मत्स्योत्पादन घट!

प्रतिनिधी / मालवण:

पर्ससीन ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच आज मी या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो. मात्र, आमच्यातील काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. भविष्यात समुद्रातील मासळीच नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढे पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनात सक्रिय राहून त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. श्री. तोडणकर म्हणाले, पर्ससीननेटच्या मासेमारीवर शासनाने निर्बंध घातल्यानंतर बारा नॉटिकलच्या बाहेर मासेमारी करणे, पर्ससीनची मासळी येथील स्थानिक बाजारात न आणणे यासारखी बंधने आम्ही स्वत:हून घालून घेतली होती. पर्ससीनधारक मच्छीमार व पारंपरिक मच्छीमार हे दोन्ही मच्छीमार जगले पाहिजेत, अशी आमची भूमिका होती. मात्र, आमच्याच काही लोकांनी हे निर्बंध पाळले नाहीत. पर्ससीननेटबरोबर त्यांनी एलईडीची विध्वंसकारी मासेमारी सुरू केली. हे आपल्याला योग्य वाटले नाही. त्यामुळे सुरुवातीस मी माझा पर्ससीन ट्रॉलर विकला. अनेकदा आमच्या सहकाऱयांना समजाविण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे गेले वर्षभर आपण संघटनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे, असेही तोडणकर म्हणाले.

मासेमारीच सापडली अडचणीत!

 सध्या जिल्हय़ातील किनारपट्टीवरील परिस्थिती पाहता ट्रॉलर चालकांना फक्त चिंगुळ, लेप यासारखी मासळी, तर रापणकर मच्छीमारांना मासळीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रापण संघ, गिलनेट हे व्यवसाय पूर्णपणे बंद पडत चालले आहेत. पारंपरिक मच्छीमार हा माझाच आहे. त्यामुळे माझ्या घराला मीच आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच मी या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्री. तोडणकर म्हणाले.

ठराविकच लोक होत आहेत मोठे!

एलईडीच्या बेछूट मासेमारीमुळे मत्स्योत्पादन घटत चालले आहे. काही ठराविक लोकच यात मोठे होत असून पारंपरिक मच्छीमारांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्याचे त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. पर्ससीन संघटनेतील अनेक सदस्यांनी आपला केवळ वापर करून घेतला. पारंपरिक मच्छीमारांच्या तोंडातील घास हे एलईडी पर्ससीनधारक, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सधारक हिरावून नेत आहेत. अशी परिस्थिती जिल्हय़ाच्या किनारपट्टी भागात कधीही नव्हती. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मच्छीमारांची पुढील पिढी बरबाद होणार आहे. एलईडीच्या जीवघेणी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळेच मी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पारंपरिक मच्छीमारांच्या लढय़ात सक्रिय होणार आहे. भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठीच काम करणार आहे. हा राजीनामा देण्यास आपल्यावर कोणाचाही दबाव, बंधन नसल्याचेही श्री. तोडणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मच्छीमार मेळावा यशस्वी होणार!

पारंपरिक मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ज्या मैदानावर घेतला होता, त्याच दांडी येथील मैदानावर मंगळवारी 21 रोजी सकल मच्छीमार मेळावा होत आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या आवाहनानुसार खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. या मेळाव्यातून सकल मच्छीमार समाज हायस्पीड, एलईडी, पर्ससीन आणि परराज्यातील मच्छीमारांच्या विरोधात संघर्षाची हाक देणार असल्याचे श्री. तोडणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.