|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शहरासाठी माझ्या विहिरीतील पाणी घ्या !

शहरासाठी माझ्या विहिरीतील पाणी घ्या ! 

प्रतिनिधी/ कागल

चालू वर्षी राज्यात अभुतपूर्व दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानाची दाहकता वाढत आहे. त्यातच  वेधशाळा, क्लायमॅट तसेच केंद्रीय हवामान खात्याने चालू वर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरु होणार असल्याचे भाकित केले आहे. त्याची झळ कागल शहरालाही बसत आहे. वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकेतर्फे विविध योजना राबविल्या जात असून यामध्ये माझ्या मालकीच्या शेतात असलेल्या विहिरीतील पाण्यासह सात मोटय़ाची विहीर, सटवाई विहीर आदी विहिरीतील पाणी उचलले जाणार आहे. यास आपली परवानगी असून अन्य विहिरीच्या संबंधित मालकांनीही त्यास संमती द्यावी, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

शाहूनगर वाचनालयाच्या सभागृहात पाणीटंचाई व दुष्काळावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीस मुख्याधिकारी टीना गवळी, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, भैय्या माने, प्रविण काळबर, पाणीपुरवठा सभापती सौरभ पाटील, रमेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ पुढे म्हणाले, राज्यात पाणीटंचाईचे अभुतपूर्व संकट उभे राहिले आहे. हवामानातील उष्णतेची दाहकता वाढत आहे. वेधशाळा तसेच हवामान खात्यानेही मान्सूनचे अगमन उशिरा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता चालूवर्षी अधिक जाणवणार आहे. सध्या राज्यातील तापमान 38 ते 40 अंश से. इतके आहे. काळम्मावाडी धरणात केवळ पाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कागल शहराला पाणीपुरवठा करणाऱया जयसिंग तलावाच्या पाण्याची पातळी केवळ 5 फूट इतकी असल्याने हे पाणी वापरण्यास योग्य नसते. त्यामुळे यापूर्वी कागल शहराचा भरवसा दूधगंगा नदीतील पाण्यावर होता. मात्र या धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने  दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळीही खालावली आहे. अशा परिस्थितीत कागल शहरातील नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. माझी  स्वमालकीची मोठी विहीर आहे. या विहिरीतील पाणी उचलून ते आंबेडकरनगरजवळील टाकीत टाकून त्या भागासाठी वापरले जावे. याचबरोबर कागल शहरात सातमोटीची विहीर व सटवाई विहीर या विहिरींनाही मुबलक पाणी आहे. या विहिरीतूनही नजिकच्या काळात पाणी उचलून जवळच्या पाण्याच्या टाकीत सोडले जावे व त्यास संबंधित विहिर मालकांनी परवानगी द्यावी, अशी विनंतीही आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

मुश्रीफ म्हणाले, कागल नगरपालिकेचे खास सभा बोलावून तसा ठराव करण्यात यावा व 15 जून नंतर त्याची कार्यवाही केली जावी. याव्यतिरीक्त आवश्यक त्या भागामध्ये नवीन बोअर खुदाई करण्यात येणार आहे. कागल शहरात सध्या आठवडय़ातून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद केला जातो. व एकदिवसा ऐवजी दोन दिवस सोमवार व गुरुवार पाणी बंद करावे. तसेच ज्या नळांना चाव्या नाहीत अशा चावीधारकांनी तात्काळ चावी बसवून पाणी वाचविण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी पालिकेने गावामध्ये जनजागृती करावी, अशा भावना आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. यावेळी भैय्या माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी यांनी विविध उपाय सूचविले.

Related posts: