|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शांतताप्रिय मतदानासाठी सर्व तयारी

शांतताप्रिय मतदानासाठी सर्व तयारी 

जिल्हाधिकारी आर. मेनका यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून आज रविवार दि. 19 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्यावेळी कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू दिला जाणार नाही, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निर्वाचन अधिकारी विवेक एच. पी. (आयएएस), उपजिल्हाधिकारी विकास गावणेकर तथा गोपाल पार्सेकर त्यावेळी उपस्थित होते. पणजीसाठी एकूण 13 मतदानकेंद्रे आहेत. त्यात 6 एकेरी तर 7 दुहेरी केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर एक साहाय्यक उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात असतील त्या व्यतिरिक्त सीआरपी पोलीस असतील अशी माहिती त्यांनी दिली. मिनेझीस ब्रागांझा सभागृहाकडील तळमजल्यावर असलेले साहित्य सेवक मंडळात अपंगांसाठी मतदानपेंद्र असेल. पणजीत एकूण 115 अपंग मतदार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मतदारसंघात एकूण 22485 मतदार असून त्यात 10697 पुरूष तर 11785 महिलांचा समावेश आहे. निवडणूक ओळखपत्र किंवा अन्य 11 दस्तऐवजांपैकी कोणताही फोटो ओळखपत्र असलेला दस्तऐवज चालू शकतो, असे त्यांनी सांगितले.

पणजीत 144 कलम,

संशयित गुन्हेगार ताब्यात

या मतदारसंघात फौजदारी आचारसंहितेचे 144 कलम लावण्यात आले आहे व जमावबंदी प्रतिबंध केली आहे. ज्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत व ते या निवडणुकीत अनुचित प्रकार करू शकतात असा कयास असलेल्या 13 जणांना ताब्यात घेतले जाईल. त्यात पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 7 तर जुने गोवेतील 6 संशयित आरोपी आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल.

अपंग, वृद्धांना मोफत वाहतूक सेवा

गोव्यातील अन्य मतदारसंघांपेक्षा पणजीत नेहमीच मतदानाची टक्केवारी कमी असते, असे पत्रकारांनी नजरेस आणून दिले असता मतदारांमध्ये जागृती करणे चालू आहे. अपंग तसेच वृद्ध मतदारांना साहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक तसेच वाहनेही नियुक्त करण्यात आली आहेत. अशा मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत व पुन्हा घरी अशी सेवा विनामूल्य देण्यात येईल.

मतदान केंद्रावर पाच कर्मचारी असतील, तसेच राखीव अधिकारीही ठेवण्यात येतील. आल्तिनो येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ही मतदानयंत्रे ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम बनवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Related posts: