|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संभाजी पाटील यांना अखेरचा निरोप

संभाजी पाटील यांना अखेरचा निरोप 

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार संभाजी पाटील यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शुक्रवारी रात्री संभाजी पाटील यांचे हृदविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी केएलईएस हॉस्पिटलमधून नातलगांच्या ताब्यात देण्यात आले.

त्यानंतर बेनकनहळ्ळी येथील फार्म हाऊसवर पार्थिव नेण्यात आले. त्यावेळी कुटुंबातील सदस्य आणि आप्तेष्टांना शोक अनावर झाला होता. काही मंडळींनी तेथे त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

तेथून संचयनी सर्कल कॅम्प येथे असणाऱया त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर भारतनगर शहापूर येथील त्यांच्या मूळ घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथून शहापूर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बॅ. नाथ पै. चौकमार्गे ही अंत्ययात्रा शहापूर स्मशानभूमी येथे पोहोचली.

शहापूर स्मशानभूमीमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. राज्याचे जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्मशानभूमीत येऊन अंत्यदर्शन घेतले. महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, खासदार सुरेश अंगडी, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मुत्सद्दी राजकारणी हरपला : किरण ठाकुर

संभाजी पाटील यांच्या निधनामुळे एक मुत्सद्दी राजकारणी हरपला आहे. चारवेळा महापौरपद भूषवून त्यांनी महापालिकेच्या राजकारणावर आपली पकड बसविली. आमदार म्हणूनही त्यांनी समाजोपयोगी कामे केली. अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काहीसे अलिप्त होते. तरीही राजकीय घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते. म. ए. समितीचे आमदार म्हणून निवडून येण्याची त्यांची आकांक्षा सफल झाली. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात ते नेहमीच असायचे. संभाजी पाटील यांच्या जाण्यामुळे मनपा राजकारणात एक पोकळी निर्माण झाली, असे म्हटले तरी वावगे होणार नाही, अशा शब्दात ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे यांची श्रद्धांजली

तत्पूर्वी राज्याचे महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये जाऊन संभाजी पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मंगळवारी शोकसभा

माजी आमदार संभाजी पाटील यांच्या निधनानिमित्त मंगळवार दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील संत रोहिदास भवन येथे ही शोकसभा होणार आहे. यावेळी म. ए. समितीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

शहराचे माजी महापौर, बेळगाव दक्षिणचे माजी आमदार संभाजी लक्ष्मण पाटील यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांच्या कारकिर्दीत सहकारी म्हणून लाभलेले माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांच्यासह मनपातील अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होता. अनेक सदस्यांनी यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, संभाजी पाटील अमर रहे’ असा घोषणा दिल्या.

माजी आमदार संभाजी पाटील यांच्या पार्थिवाला कुटुंबातील सदस्यांनी अग्नी देऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, गोविंद राऊत, नागेंद्र हैबत्ती, अप्पासाहेब पुजारी, मधुश्री पुजारी, सरिता पाटील माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी नगरसेविका सरला हेरेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जयराम मिरजकर, जि. पं. शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल, माजी उपमहापौर संजय शिंदे, वाय. बी. चौगुले, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी माजी नगरसेवक पंढरी परब, राकेश पलंगे, शिवाजी कुडूचकर, नेताजी जाधव, विजय भोसले, म. ए. समिती आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, प्रकाश मरगाळे, अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री आणि इतर सदस्य उपस्थित होते. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यांचा रक्षाविसर्जन विधी सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.