|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आश्वासनावर शेतकऱयांची बोळवण

आश्वासनावर शेतकऱयांची बोळवण 

हलगा-मच्छे बायपासला विरोध करण्यासाठी शेतकऱयांचा मोर्चा   लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

प्रतिनिधी/ बेळगाव

हलगा-मच्छे बायपासमध्ये पिकाऊ शेतजमीन गमाविणाऱया आणि हतबल झालेल्या शेतकऱयांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या जमिनी वाचविण्यासाठी टाहो फोडला. बायपास तसेच रुंदीकरणाचे काम बंद करावे, जमिनी द्या किंवा आपला जीव घ्या, असे सांगत त्यांनी फास घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या पिकाऊ जमिनी वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींसमोर विनवण्या केल्या. मात्र, राज्याचे महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून केवळ आश्वासन मिळाल्याने नेहमीप्रमाणे शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झाला. यामुळे हलगा-मच्छे बायपासमध्ये जमिनी गमाविणाऱया शेतकरी बांधवांना आपला लढा यापुढेही सुरूच ठेवावा लागणार आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी शुक्रवारी उभ्या पिकांवर जेसीबी फिरविण्यात आला होता. तसेच पोलीस बंदोबस्तात व दडपशाहीने शेतकऱयांच्या विरोधाला न जुमानता बायपास रस्त्यासाठी रुंदीकरणाचे काम सुरूच ठेवले आहे. विरोध करणाऱया शेतकऱयांना पोलीस स्थानकात डांबण्यात येत आहे. यामुळे आपल्या पिकाऊ जमिनी वाचविण्यासाठी शेतकरी कुटुंबीयांच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी आणि जनावरे घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. तर यामध्ये महिला तसेच मुलांचाही सहभाग मोठा होता. ‘बंद बंद करा, बायपास रस्ता बंद करा, जीव देऊ पण जमीन देणार नाही’, अशा घोषणा देत सरकार व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात येत होता. महिला तर जमिनीवरच ठाण मांडून शंखध्वनी करून प्रशासनाचा निषेध नोंदवित होत्या. भर उन्हात टाहो फोडून काम थांबविण्याची मागणी करण्यात येत होती. सुपीक जमिनीतील काळी माती आणून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात टाकूनही निषेध नोंदविण्यात आला.

शेतकऱयांच्या या मोर्चाला कर्नाटक राज्य रयत संघाच्या राजश्री गुळण्णावर, यल्लाप्पा पुजेरी यांच्यासह इतर भागातील शेतकरी बांधवांनी पाठिंबा दिला होता.

राज्याचे महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यामुळे बैठक संपताच त्यांना संतप्त शेतकऱयांच्या मोर्चासमोर यावे लागले. मात्र, आरव्हींनी याबाबत संबंधित अधिकाऱयांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कोणत्याही सरकारी योजनेसाठी शेतजमीन हवी असल्यास त्या मोबदल्यात शेतकऱयांना योग्य दर द्यावा लागतो, असेही सांगितले. तर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या बायपाससाठी पुन्हा सर्व्हे करण्याची सूचना अधिकाऱयांना करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱयांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्याचा प्रकार घडला आहे.

शेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे यांच्यासह उपाध्यक्ष सुभाष लाड, हनमंत बाळेकुंद्री यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेचे चन्नाप्पा पुजारी, जयश्री गुळण्णवर, प्रकाश नायक, यांच्यासह यमकनमर्डी व अन्य भागातील शेतकरी तसेच वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, मच्छे, मजगाव, हलगा आदी भागातील शेतकऱयांनी मोर्चात सहभाग दर्शविला होता.

प्रारंभी चन्नम्मा सर्कल येथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे दोन तास भरउन्हात शेतकरी बांधवांना उभे रहावे लागले. एकीकडे आपली तुटपुंजी शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकऱयांना सर्व आघाडय़ावर लढा द्यावा लागत आहे. तर प्रशासनाच्यावतीने पोलीस बळाचा वापर करत दडपशाहीने त्यांच्या पिकाऊ जमिनी ताब्यात घेण्यात येत आहे. यामुळे ही गोरगरीब शेतकरी कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. मात्र, या शेतकऱयांच्या पाठिशी खंबीरपणे कोणीही उभे राहत नसल्याने ते हतबल झाले आहेत. आपल्या पिकाऊ जमिनी वाचविण्यासाठी ते प्राणपणाने लढत आहेत. मात्र, प्रशासनाच्या दांडगाई आणि दंडुकेशाहीमुळे शेतकऱयांना दहशतीखाली रहावे लागत आहे. याचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला.