|Saturday, October 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या पलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या पलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ 

तरुणाई म्हटले की, ओघाने प्रेम हे आलेच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांना स्थान नसते. प्रेमापुढे सामाजिक, आर्थिक पातळी सुद्धा विरून जातात. तसेच प्रेम म्हटले की, रुसवे-फुगवे, धूसफूस व हलकी भांडणे सुद्धा ओघाने आलीच. कधीकधी या लहानशा रुसव्या-फुगव्यांचे रूपांतर ‘ब्रेकअप’मध्ये सुद्धा होते. अशाच शक्य-अशक्यतांचा विचार करून निर्माते विश्वजित पाटील यांनी ‘पिरेम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करावयाचे ठरविले असून याची कथा, पटकथा आणि संवाद विश्वजित पाटील आणि रामभाऊ यांनी लिहिले आहेत.

‘पिरेम’ या नावावरून कल्पना आलीच असेल की, कथा ग्रामीण भागातील आहे. ही कहाणी एका गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो. परंतु, तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो. याचे चित्रण अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने दिग्दर्शक प्रदीप लायकर यांनी ‘पिरेम’ या चित्रपटातून मांडले आहे. या चित्रपटातून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे, विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी तगडी कलाकार मंडळी सोबतीला आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संभाजीराव बाळासाहेब पाटील (शिवछत्रपती पुरस्कार विजेते), तेलगु टायटन्सचे प्रशिक्षक डॉ. रमेश भेन्दिगिरी (दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते 1996), विठ्ठल पाटील, डॉ. अण्णासाहेब गावडे आणि युवराज पाटील यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाला.