|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑस्ट्रेलियात मॉरिसन यांच्या आघाडीची सरशी

ऑस्ट्रेलियात मॉरिसन यांच्या आघाडीची सरशी 

कॉन्झर्व्हेटिव्ह आघाडीला मिळाला ‘चमत्कारिक’ विजय

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सार्वत्रिक निवडणुकीत स्वतःच्या कॉन्झर्व्हेटिव्ह आघाडीवर पुन्हा विश्वास दाखविल्याप्रकरणी मतदारांचे आभार मानले आहेत. माझा नेहमीच ‘चमत्कारांवर’ विश्वास होता, असे उद्गार मॉरिसन यांनी समर्थकांना संबोधित करताना काढले आहेत. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये लिबरल-नॅशनल आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

लेबर पार्टीचे नेते बिल शॉर्टन यांनी पराभव मान्य करत पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप लागायचा असला तरीही 70 टक्क्याहून अधिक मतांची मोजणी पूर्ण झाली असून मॉरिसन यांच्या आघाडीची सरशी झाली आहे. बहुमतासाठी 76 जागांची गरज असून मॉरिसन यांच्या आघाडीने 74 जागांवर यश मिळविले आहे. तर लेबर पार्टी 66 जागांवर आघाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियात शनिवारी मतदान पार पडले होते. मागील दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणांमध्ये लेबर पार्टीच आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्वेक्षणांच्या पार्श्वभूमीवर लेबर पार्टी सत्तेवर येणार असल्याचे मानले जात होते. पण अंतिम टप्प्यात मॉरिसन हे मतदारांना स्वतःसोबत आणण्यास यशस्वी ठरले आहेत. शॉर्टन यांनी फोन करत मॉरिसन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.