|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पहिला सर्जिकल स्ट्राईक 2016 मध्येच!

पहिला सर्जिकल स्ट्राईक 2016 मध्येच! 

भारतीय सैन्याची स्पष्टोक्ती : काँग्रेसचा दावा ठरला खोटा : बालाकोट हवाई हल्ल्याची कारवाई प्रशंसनीय :  पाकिस्तानचे कट हाणून पाडले

वृत्तसंस्था/  उधमपूर

 पहिला सर्जिकल स्ट्राईक सप्टेंबर 2016 मध्येच करण्यात आल्याचे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. बालाकोट एअर स्ट्राईक अत्यंत प्रशंसनीय असल्याचेही सैन्याने सोमवारी म्हटले आहे. वायुदलाची विमाने पाकिस्तानातील दहशतवादी नष्ट करत सुखरुप परतली आहेत. सर्जिकल स्ट्राईकबद्दल राजकीय पक्षांच्या भूमिकांवर आम्ही टिप्पणी करू शकत नसल्याचे नॉदर्न कमांडचे जीओसी इन चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितले आहे.

पहिला सर्जिकल स्ट्राईक सप्टेंबर 2016 मध्ये झाल्याचे डीजीएमओने एका आरटीआय अर्जाच्या उत्तरादाखल स्पष्ट केले होते. राजकीय पक्ष काय सांगतात हे मी जाणत नाही. राजकीय पक्षांना सरकारचं उत्तर देऊ शकेल. पण मी जे बोलतोय ते सत्य असल्याचे सिंग म्हणाले.

पाकला आगळीक महागात

कुठल्याही प्रकारच्या आगळीकीकरता पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक येण्याचे धाडस करू नये हेच योग्य ठरणार आहे. आमची सैन्य रणनीती नेहमीच स्पष्ट राहिली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून कुठल्याही प्रकारचे दुस्साहस झाल्यास आमच्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. भारतीय सैन्याची क्षमता, विशेष मोहीम पार पाडण्याचे कौशल्य आणि दृढनिश्चय पाकिस्तानच्या कुठल्याही आव्हानाला हाणून पाडण्यास सक्षम असल्याचा विश्वास देशाला देऊ इच्छित असल्याचे लेफ्टनंट जनरल सिंग यांनी म्हटले आहे.

पाकच्या कारवाया पुन्हा सुरू

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा स्थिती नियंत्रणात असून चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत. घुसखोरी, शस्त्रसंधी उल्लंघन, अमली पदार्थांची तस्करी, बनावट चलनाच्या माध्यमातून पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करत आहे. भारतासोबतच्या छद्म युद्धाची स्थिती कायम रहावी अशी पाकिस्तानची इच्छा असली तरीही आमच्या निरंतर प्रयत्नांमुळे यात तो यशस्वी झाला नसल्याचे सिंग म्हणाले.

यंदा 86 दहशतवाद्यांचा खात्मा

भारतात अलिकडेच अत्यंत सुरक्षित वातावरणात लोकसभा निवडणूक पार पडली असून याचे शेय प्रशासन आणि सुरक्षा दलांना दिले जावे. निवडणुकीदरम्यान कोणताही मोठा हल्ला झालेला नाही. यशस्वी आणि सुरक्षित मतदान प्रक्रिया पार पाडण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत. ठोस गुप्त माहितीच्या आधारावर दहशतवाद्यांच्या उच्चाटनाचे प्रयत्न सुरू राहतील. यंदा आम्ही आतापर्यंत 86 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून पुढील कालावधीतही अशाप्रकारचा खात्मा सुरू ठेवू इच्छितो. चालू वर्षात आतापर्यंत सुमारे 20 फरार दहशतवाद्यांना पकडण्यात आले असून वाट चुकलेल्या अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असे सिंग यांनी सांगितले.