|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एक्झिट पोल अंदाजानंतर सेन्सेक्समध्ये विक्रमी तेजी

एक्झिट पोल अंदाजानंतर सेन्सेक्समध्ये विक्रमी तेजी 

10 वर्षातील उच्चांकी उसळी : मुंबई शेअर बाजार निर्देशांक 39 हजारावर, निफ्टीही वधारला

मुंबई / वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलनंतर शेअर बाजारामध्ये सोमवारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवारी सकाळपासून दिवसअखेरपर्यंत शेअर बाजाराने तब्बल 1,421 अंकांची उसळी मारली. त्यामुळे सेन्सेक्सने 39 हजारचा टप्पा पार केला.  तसेच निफ्टी निर्देशांकही 400 हून अधिक अंकांनी वधारला.

एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले असून शेअर बाजाराने 10 वर्षांतील विक्रमी उसळी घेतली आहे. निफ्टीचा निर्देशांक 421.10 अंकांनी वधारला. आजचे व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्सने 39,352.67 तर निफ्टीने 11 हजार 828.25 अंकांचा टप्पा गाठला होता.

लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले असून त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा केंद्रात सत्तेत येणार असल्याचे अनुमान नोंदवले. त्यानंतर सोमवारी सकाळी शेअर बाजारात तेजीची लहर पाहायला मिळाली. सकाळी साडेनऊ वाजता शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने उसळी घेतली. मुंबई शेअर बाजार निर्देशांक शुक्रवारी 37,930.77 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच तो 946 अंकांनी वधारला आणि 38 हजार 829 अंकांवर पोहोचला. निफ्टीतही तशीच तेजी पाहायला मिळाली.