|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अंदाधुंद गोळीबारात ब्राझीलमध्ये 11 ठार

अंदाधुंद गोळीबारात ब्राझीलमध्ये 11 ठार 

दहशतवादी हल्ल्याची शक्यता फेटाळली 

वृत्तसंस्था/ रिओ डी जनरिओ

ब्राझीलच्या उत्तर प्रांतातील पारा राज्यात अज्ञात बंदूकधाऱयांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 11 जण ठार झाले आहेत. बेलेम शहरातील एका बारमध्ये रविवारी उशिराने ही घटना घडल्याचे राज्याच्या जनसुरक्षा विभागाने म्हटले आहे. या गोळीबाराचा उद्देश अद्याप स्पष्ट झाला नसला तरीही हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

उत्तर ब्राझीलमधील पारा राज्यच्या बेलेम शहरात ही घटना घडली असून हल्लेखोर घटनेनंतर पळून गेले, अशी माहिती स्थानिक वृत्त वाहिनी जी-1ने दिली आहे. या घटनेमध्ये एक हल्लेखोर जखमी झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुरखे घालून आलेल्या या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये सहा महिला आणि पाच पुरुष ठार झाल्याचेही या वाहिनीने म्हटले आहे. एक मोटारसायकल आणि तीन कारमधून आलेल्या सातजणांनी हा गोळीबार केला आणि त्यानंतर तेथून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहे. ब्राझील हा प्रांत व बेलेम शहर सर्वाधिक हिंसक घटनासाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्याच महिन्यात सरकारने या ठिकाणी 90 हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. गेल्या तीन महिन्यात या ठिकाणी 756 हून जणांचे मुडदे पाडले गेले आहेत.