|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कलामंदिर घेणार बेळगावकरांचा निरोप

कलामंदिर घेणार बेळगावकरांचा निरोप 

प्रतिनिधी/ बेळगाव

बहुमजली व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी कलामंदिरची इमारत हटविण्यास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे नाटक, विविध स्पर्धा, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम, सभा-संमेलने, शरीरसौ÷व स्पर्धा, बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे कार्यक्रम आणि विवाह सोहळय़ाचा साक्षीदार असलेले कलामंदिर बेळगावकरांचा निरोप घेणार आहे.

बेळगावकरांना 49 वर्षे सेवा दिलेल्या कलामंदिरच्या जागेत स्मार्ट सिटी योजनेमधून बहुमजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. बदलते राहणीमान आणि दैनंदिन गरजा पुरविताना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर वाढत आहे. यामुळे कलामंदिरचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला होता. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ या तत्वावर व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या उपक्रमाला प्रतिसाद लाभला नाही. यामुळे स्मार्ट सिटी योजनेमधून अद्ययावत सुविधायुक्त व्यापारी संकुल उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. याकरिता 43 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दीडशे चारचाकी वाहनांकरिता पार्किंग सुविधा, दुचाकी पार्किंग, कार्यालयाकरिता गाळे, नाटय़गृह, व्यापारी गाळे आदीसह विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी कलामंदिरच्या जागेचा ताबा स्मार्टसिटी कंपनीने नुकताच घेतला आहे. यामुळे कलामंदिरच्या जागेत असलेल्या इमारती आणि अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

कलामंदिरची उभारणी 1970 मध्ये करण्यात आली होती. शहरातील एकमेव सभामंडप असल्याने याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात येत होत्या. बॅ. नाथ पै व्याख्यानमाला व याअंतर्गत आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम कलामंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात येत होते. तसेच विविध शाळा कॉलेजचे स्नेहसंमेलन आणि सभा-संमेलनासाठी सभामंडपाचा वापर होत असे. प्रसिद्ध नाटके सादर करण्यात आली असून या व्यतिरिक्त गरजूंना अल्पदरात विवाह सोहळय़ाकरिता कलामंदिर उपलब्ध करून देण्यात आले होते. पण कालांतराने कलामंदिरच्या देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली आहे. यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत याठिकाणी बहुमजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून या कामाकरिता कलामंदिरची जागा महापालिकेने स्मार्ट सिटीकडे हस्तांतर केली आहे. यामुळे कलामंदिर हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सभागृहात असलेल्या खुर्च्या हटविण्यात आल्या. सोमवारपासून कलामंदिरच्या खिडक्मया, दरवाजे हटविण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे सांस्कृतिक व साहित्याचा साक्षीदार असलेले कलामंदिर काळाच्या पडद्याआड जाणार आहे. लवकरच ही इमारत भुईसपाट होवून याठिकाणी टोलेजंग बहुमजली अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे.