|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावातून विमानसेवांना उत्तम प्रतिसाद

बेळगावातून विमानसेवांना उत्तम प्रतिसाद 

प्रतिनिधी/ बेळगाव

तासंतास चालणारा रेल्वे प्रवास किंवा कंटाळवाणा रस्ते प्रवास टाळून विमानांची उपलब्धता होत असल्यामुळे विमान सेवांना बेळगावातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. उडानच्या तिसऱया फेजमध्ये मंजूर झालेल्या 13 मार्गांपैकी तीन मार्गांवर उपलब्ध झालेल्या सहा विमानांकडील प्रवाशांचा ओढा वाढु लागला आहे.

स्पाईस जेटच्या हैद्राबाद-बेळगाव विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेळगावहून हैद्राबादला जाणाऱया प्रवाशांमुळे दररोज विमानातील 90 टक्के आसने आरक्षित होत असून परतीच्या प्रवासात 93 टक्के आसने भरली जात आहेत. अलायन्स एअरच्या बेळगाव-पुणे विमानसेवेच्या बाबतीत जाताना 76 टक्के तर येताना 80 टक्के प्रवासी असे चित्र आहे.

स्टारएअरच्या बेंगळूर-बेळगाव-अहमदाबाद या विमानसेवेला बेंगळूरहून निघून बेळगावमार्गे अहमदाबादला जाताना 64 टक्के प्रवासी मिळत असून परतीच्या प्रवासात विमान 96 टक्के प्रवाशांनी भरु लागले आहे. दरम्यान इंडियन एअर लाईन्स व अलायन्सची बेळगाव-बेंगळूर ही विमानसेवा उडानअंतर्गत येत नसल्यामुळे तिकीटदर जास्त असून प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी आहे.

उडानअंतर्गत बेळगाव-मुंबई विमानसेवेला मंजुरी मिळाली असून ही विमानसेवा लवकरात लवकर सुरु झाल्यास प्रवाशांचा प्रतिसाद चांगलाच मिळू शकणार आहे.